पर्युषणसाठी घेतली सुट्टी, 32 विद्यार्थ्यांचं शाळेतून निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना आॅनलाईन । मुंबई

कोणत्याही परवानगीशिवाय पर्युषणासाठी सुट्टी घेणाऱ्या 32 विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त मोडल्याचे सांगत मालाड येथील चिल्ड्रन्स अकॅडमीने या त्यांना 3 दिवसांकरता निलंबित केले. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला पत्र लिहून विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेण्यास सांगितलं. मात्र असे केल्यास चुकीची प्रथा पडेल, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

शाळा व्यवस्थापन सर्व धर्मांचा आदर करते. शाळेत जैन धर्मिय अन्य विद्यार्थी देखील आहेत. त्यांनी आधीच शाळेला कळवल्यामुळे त्यांची रजा मंजुर करण्यात आली आहे. परवानगी मागितल्यास धार्मिक कार्यासाठी तीन दिवसांच्या शाळा व्यवस्थापनाकडून दिल्या जातात. मात्र निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी परवानगी न घेता गेल्या आठवड्यात सहा ते आठ दिवस सुट्टया घेतल्या होत्या. तेव्हा शाळेची शिस्त मोडली जाऊ नये म्हणून कारवाई करण्यात आली, असे शाळेचे विश्वस्त रोहन भट यांनी सांगितले.

भट असे ही म्हणाले की, शाळेत जैन विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहेत. परवानगी शिवाय सुट्टी घेतल्यास विद्यार्थ्यांना निलंबित केले जाऊ शकते. तसा शाळेचा नियमच आहे. पालकांना शाळेच्या नियमांबद्दल आधीच माहिती दिली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निलंबित विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी काहींनी धार्मिक संंस्थांशी संपर्क साधला आणि शाळेने निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. तसेच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देखील लिहिले, पत्राद्वारे शाळा प्रशासनाला निलंबन निर्णय रद्द करण्याची विनंती केली. निलंबनामुळे मुलं मानसिक तणावात असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटल्याचं कळतं.

तर एका सदस्याने असे सुचविले की, ‘पुढील वर्षापासून 3 दिवसांच्या सुट्ट्या या वाढवून 5 दिवस देण्यात याव्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना धार्मिकविधीत अडथळा होणार नाही आणि शाळेची शिस्तही मोडणार नाही. आम्ही शाळेला लिखित अर्ज दिला आहे आणि त्यांनी कोर कमिटीसह चर्चा करण्याचे वचन दिलेले आहे’. शाळा या विनंतीकडे लक्ष देईल असे भट यांनी सांगितले.