
आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आली असून, विजेत्या संघावर ‘लक्ष्मीमाता’ प्रसन्न होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकून 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 82 कोटी 95 लाख 82 हजार रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला चार दशलक्ष म्हणजे सुमारे 33 कोटी रुपयांचे तगडे बक्षीस दिले जाणार असून, उपविजेत्या संघाला 2 दशलक्ष म्हणजे 16 कोटी रुपये दिले जाणार असल्याने संघ मालामाल होणार आहेत.
हिंदुस्थानामध्ये होणाऱया आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे दहा ते बारा दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार असल्याने क्रिकेटप्रेमी या महास्पर्धेची चातकासारखी वाट पाहत आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व 10 संघ ‘राऊंड-रॉबिन’ पद्धतीने एकमेकांशी झुंजणार आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. साखळी स्पर्धेतील सामना जिंकल्यावरही विजेत्या संघावर बक्षिसाचा वर्षाव केला जाणार आहे. साखळीतील संघांना प्रत्येकी 82 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातील संघांवरही कोटींचा वर्षाव केला जाणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत संघांना सहा कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
युवा विश्वचषक पुढच्या वर्षी लंकेत
आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजते तोच पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱया 19 वर्षांखालील (युवा) विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. येत्या 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत श्रीलंकेमध्ये ही स्पर्धा पार पडणार असल्याचे आज ‘आयसीसी’ने जाहीर केले.
आगामी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत 16 संघांचा समावेश असल्यामुळे एक रोमहर्षक स्पर्धेचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 2006 नंतर प्रथमच श्रीलंकेत स्पर्धा रंगणार आहे. 13 जानेवारीला श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे, तर हिंदुस्थानचा पहिला सामना 14 जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होईल. या स्पर्धेत 16 संघांची 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार असून, त्यानंतर सुपर-सिक्स फेरीला सुरुवात होईल.


























































