यूपीएससीत मराठीचा झेंडा, महाराष्ट्रातील 35 पेक्षा जास्त उमेदवारांची बाजी

1289

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा – 2019 चा निकाल आज जाहीर केला. या परीक्षेत हरयाणाचा प्रदीप सिंह हा देशात अव्वल ठरला तर देशात 15 वा रँक मिळवणारी नेहा भोसले ही महाराष्ट्रातून पहिली आली. देशात जतीन किशोर याने दुसरा तर उत्तर प्रदेशची प्रतिभा वर्मा हिने तिसरा क्रमांक पटकावला.

महाराष्ट्रातील  35 पेक्षा जास्त उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवले. गेल्या सप्टेंबरमध्ये नागरी सेवांसाठी मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या 2307 विद्यार्थ्यांच्या मुलाखती व व्यक्तिमत्व चाचणी गेल्या फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत झाली. त्यातून देशभरातून 829 उमेदवारांची निवड झाली.

निवड झालेल्या  829 उमेदवारांपैकी 180 उमेदवार आयएएस, 24 आयएफएस, 150 आयपीएस, 438 ग्रुप ‘ए’ तर 135 जणांची ग्रुप ‘बी’च्या पदांसाठी पात्र ठरले आहेत अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.

ते संधीचे सोने करतील

नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी उमेदवारांनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून ते या संधीचेही सोने करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

बीडचा मंदार पत्की पहिल्याच प्रयत्नात आयएएस

बीडचा मंदार पत्की याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 22 वा रँक मिळवून आयएएस होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

अंधत्वावर मात करून बाजी

पुण्याचा जयंत मंकले याने यूपीएससी परीक्षेत 143 देशात 143 वा क्रमांक पटकावला. यापूर्वीही त्याने ही परीक्षा दिली होती. त्यात त्याची रँक 937 होती. यावेळी त्याने जोमाने अभ्यास केला.

पंढरपूरचा शेतकरीपुत्र झाला आयएएस

पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुख याने यूपीएससी परीक्षेत 151 वा रँक मिळवला. त्याची आयएएससाठी निवड झाली आहे.

वन अधिकारी प्रशिक्षण घेतानाच यूपीएससी उत्तीर्ण

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतानाच यूपीएससीचा अभ्यास करून जालनाचा अभिजीत वायकोस यशस्वी झाला.

आपली प्रतिक्रिया द्या