
हिंदी महासागरात रविवारी 90 किलोमीटर खाली 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. पहाटे 5 वाजून 39 च्या सुमारास भूपंपाचा धक्का जाणवला. हा सामान्य भूकंप असून त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नसल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले. हा भाग भौगोलिकरीत्या सक्रिय आहे. भूपंपाच्या घटनेत समुद्राखाली हालचाली दिसून आल्या आहेत. मात्र कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. भूकंप पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली 700 किलोमीटरपर्यंत कुठेही होऊ शकतो.
न्यायदानातील एआय वापराला गुजरात हायकोर्टाकडून बंदी
न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत व निकालपत्रासाठी (एआय) वापर करण्यावर गुजरात उच्च न्यायालयाने कडक बंदी घातली आहे. न्यायदानात, जामिनावर निर्णय घेताना, युक्तिवादांचे वजन जोखताना किंवा निकालपत्राचा मसुदा तयार करताना एआयचा थेट किंवा अप्रत्यक्ष वापर करू नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गुजरातमध्ये शनिवारी जिल्हा न्यायपालिकेच्या न्यायाधीशांच्या परिषदेत नवीन ‘एआय धोरण’ जाहीर करण्यात आले. यानुसार एआयचा वापर पुराव्यांच्या छाननीसाठी, कायदेशीर कलमे लावण्यासाठी किंवा साक्षीदार, पक्षकार आणि वकिलांची खासगी/गोपनीय माहिती हाताळण्यासाठी पूर्णपणे निषिद्ध असेल. केवळ प्रशासकीय कामांसाठी एआयला मुभा देण्यात आलेय.
फिरत्या पृथ्वीच्या स्टेजवर रॅपर कान्ये वेस्ट याचा जलवा
अमेरिकन रॅपर आणि हिप-हॉपचे दिग्गज कलाकार कान्ये वेस्ट यांनी नुकतेच लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियममध्ये फिरणाऱ्या पृथ्वीच्या आकाराच्या स्टेजवर जबरदस्त सादरीकरण केले. डार्क लाईट, फॉग आणि स्पॉट लाईट्सच्या वापरामुळे स्टेज असे दिसत होते की जणू ते अंतराळात फिरणाऱ्या पृथ्वीवर उभे आहेत. या कॉन्सर्टमध्ये 70 हजार प्रेक्षक उपस्थित होते. तिकीट 13 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंत होती. कान्येने चार वर्षांनंतर स्टेजवर पुनरागमन केले आहे. कान्ये 23 मे रोजी हिंदुस्थानात येत आहे आणि नवी दिल्लीत कॉन्सर्ट करणार आहे.
मोहफुले वेचणे जिवावर बेतले, वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केले. ही घटना चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात घडली. हरिदास कुबडे (58) असे त्यांचे नाव आहे. ते शनिवारी जंगलात गेले होते. त्यांना शोधण्यासाठी पुतण्या संध्याकाळी शेताकडे गेला असता त्याला दोन वाघ व दोन बछडे दिसले. यामुळे पुतण्या घाबरून घरी परतला. त्याने घटनेची माहिती वन विभाग व पोलीस विभागाला दिली. त्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र हरिदास कुबडे यांचा शोध लागला नाही. रविवार, 5 एप्रिल सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.


























































