
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
माघीवारी एकादशीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून चार लाखांहून अधिक वारकरी भाविक उपस्थित आहेत. विठुरायाची अवघी पंढरी ज्ञानबा-तुकारामाच्या नामघोषात तल्लीन झालेली पाहायला मिळते. भल्या पहाटे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सहपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईचे महापूजा केली.
महापूजेनंतर देवाचे दर्शन खुले करण्यात आले. देवाच्या पददर्शनाच्या रांगेत एक लाखांहून अधिक भाविक उभे आहेत. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा वेळ लागत आहे. वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटेपासून चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी केली. स्नान करुन नगरप्रदक्षिणा घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाविकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद इतर शासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत.





























































