
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर लादलेल्या नोटाबंदीच्या काळात अनेक नागरिकांचा मृत्यू बँकांच्या रांगेत झाला, हे सरकारने कबूल केले नव्हते. आज मान्य केले; पण नोटाबंदीत देशभरात केवळ चार जणांचा बळी गेला. त्यात स्टेट बँकेचे तीन कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे, असे सरकारने आज सांगितले. राज्यसभेत नोटाबंदीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे.
नोटा छपाईचा खर्च 8000 कोटी
नोटाबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर 2016ला केली. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बाद केल्या. नवीन 2000ची नोट चलनात सुरुवातीला आणली. त्यानंतर रंग बदलून 500ची नोट आली. 200, 100, 50च्याही नवीन नोटा आल्या. यामुळे छपाईचा खर्च वाढला. नोटाबंदी झाली त्यावर्षी 2016-17 मध्ये नोटा छपाईचा खर्च 7965 कोटींपर्यंत पोहोचला. 2017-18च्या आर्थिक वर्षात नोटा छपाईसाठी 4921 कोटी रुपये खर्च झाले. नोटाबंदीपूर्वी 2015-16 या आर्थिक वर्षात छपाईचा खर्च 3422 कोटी झाला होता.
























































