पावसामुळे पाझर तलावाच्या पाण्यात 4 टक्क्यांनी वाढ

मागील आठवडय़ात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने जिह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठय़ात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस राहिल्यास जिह्यातील पाझर तलावांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनच्या दमदार एण्ट्रीचा खरीप पेरणीला फायदा झाला असून, शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे.

सांगली जिह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प 78 असे एकूण 83 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये 7775 दशलक्ष घनफूट पाणीसाठय़ाची क्षमता आहे. 29 मे 2024 रोजी 83 प्रकल्पांमध्ये 1044 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाण्याची टक्केवारी 13 होती. मागील आठवडाभरात जिह्यात जोरदार मान्सून पावसाचे आगमन झाले. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पाझर तलावांच्या पाणी साठय़ामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे.

सांगली जिह्यातील 83 प्रकल्पांमध्ये सध्या 1434 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये जवळपास 4 टक्के पाणीसाठा वाढून 17 टक्के झाला आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस पडत राहिल्यास जवळपास 50 टक्क्यांपर्यंत मध्यम आणि लघु प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. पावसाची दमदार एण्ट्री झाल्यामुळे जिह्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. जिह्यात आतापर्यंत सरासरी 106.5 मि.मी. पाऊस झाला आहे.

कोरडय़ा तलावातही जमा झाला पाणीसाठा

पाटबंधारे विभागाच्या 29 मे रोजीच्या अहवालानुसार जिह्यातील 20 पाझर तलाव कोरडे आणि 24 तलावांमध्ये मृत पाणीसाठा होता. सध्या 17 तलाव कोरडे असून, 19 तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. कोरडे पडलेले तीन तलाव भरले असून, मृतसाठा असणाऱया पाच तलावांतही पाणी आले आहे.