नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, मजुरांची टंचाई; 40 हजार एकरांवरील द्राक्षबागा जमीनदोस्त

एकेकाळी सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा बनलेल्या द्राक्षबागा आज सांगलीकरांच्या दृष्टीने तोटय़ाच्या ठरू लागल्याने तब्बल 40 हजार एकरांवरील द्राक्षबागा शेतकऱयांनी जमीनदोस्त केल्या आहेत. हवामान बदलामुळे वाढलेली नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चातील प्रचंड वाढ, मजुराची टंचाई आणि बाजारभावातील घसरण ही प्रामुख्याने द्राक्ष उत्पादनावर परिणाम करणारी कारणे ठरली आहेत.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष लागवडीला सुरुवात 1960 मध्ये तासगाव तालुक्यात अवघ्या 10 ते 12 एकरांवर झाली होती. पुढील 10 वर्षांत हे क्षेत्र एक हजार एकरांवर पोहोचले आणि दुष्काळी तालुक्याची ओळख असणारा हा तालुका ‘द्राक्ष पंढरी’ म्हणून ओळखू लागला. द्राक्षतज्ञ सुभाष आर्वे यांनी प्रारंभी तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादनाचा प्रयोग केला. द्राक्ष पिकातून प्रचंड फायदा होतो आहे, हे लक्षात येताच अनेक शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळले. हळूहळू द्राक्ष उत्पादनामध्ये वाढ होत, तासगाव तालुक्याबरोबरच खानापूर, जत, कवठेमहांकाळ, मिरज अशा अनेक तालुक्यांतील शेतकऱयांचा कल द्राक्ष उत्पादनाकडे वाढला. सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनाचे एकूण क्षेत्र एक लाख वीस हजार एकरांवर पोहोचले होते. द्राक्ष पिकातून शेतकऱयांना चांगला नफाही मिळत होता. त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनाबरोबरच बेदाणा निर्मितीही मोठय़ा प्रमाणात होत होती.

सांगली जिल्ह्यातील बेदाण्याला परदेशातही मोठी मागणी आहे. त्यातून मोठी आर्थिक कमाई होत होती. मात्र, अलीकडच्या काळात हवामानातील बदलामुळे द्राक्ष पिकावरच नव्हे; तर एकूणच द्राक्ष बागातदार शेतकऱयांवर मोठे संकट कोसळले आहे. विशेषतः कोरोनाच्या काळानंतर द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे खऱया अर्थाने मोडले. काही वर्षे शेतकऱयांनी तोटा सहन करून बागा टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, दरात सातत्याने होणारी घसरण आणि उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे शेतकऱयांची ओढाताण सुरू झाली. त्यातच मजुरांचा तुटवडा, स्थानिक मजुरांची जागा परप्रांतीय मजुरांनी घेतली. त्याचबरोबर औषधे आणि इतर खर्चात झालेली वाढ शेतकऱयांच्या आवाक्याबाहेर गेली. उत्पादीत मालाला मिळणारा दरही दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने शेतकऱयांनी द्राक्षबागेकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. त्यामुळेच आज सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर कुऱहाड चालविण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून सतत असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे यंदा द्राक्ष बागाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. उत्पादन घटत असताना खर्च मात्र वाढतच आहे. अनियमित हवामान, घसरलेले बाजारभाव आणि निर्यात अडचणीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱयांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. विशेष म्हणजे ज्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनाचा श्री गणेशा झाला. त्या सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागावर कुऱहाड चालविण्याची वेळ आज शेतकऱयांवर आली आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास 40 हजार एकरांवरील द्राक्षबागा शेतकऱयांनी जमीनदोस्त केल्या आहेत.

स्वप्नांचा चक्काचूर झाला – तुकाराम पाटील

– गेल्या चार वर्षांत द्राक्ष शेतीने स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. जेमतेम नव्हे, तर तोटय़ाचा धंदा झाला आहे. इतर व्यावसायात उत्पादक किंमत ठरवितो. शेतीत मात्र बाजारभाव आपल्या हातात नाहीत. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत द्राक्षाचे दर वाढले नाहीत. शेती तोटय़ात गेल्याने आज मी दोन एकर बाग तोडली आहे. आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, असे कुमठे येथील द्राक्षबागायतदार तुकाराम पाटील यांनी सांगितले.