अमरनाथ यात्रेकरूंना ‘बारकोड’, 40 हजार जवानांची सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-कश्मीरातील प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी मोठी सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी ‘बारकोड’ स्लिप दिली जाणार असून यात्रेच्या मार्गावर तब्बल 40 हजार जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

या वर्षी 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून 45 दिवसांपर्यंत ही यात्रा चालणार आहे. अमरनाथ यात्रा काळात जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांचा धोका आहे. दोन वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आठ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तसेच पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी मोठी सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.

प्रत्येक यात्रेकरूला बारकोड स्लिप देण्यात येईल. त्यावर यात्रेकरूंचा क्रमांक असेल. या बारकोड स्लिपमुळे यात्रेकरूचे नाव, गाव, त्याचा फोटो, संपर्क क्रमांक, यात्रामार्ग याची माहिती प्रशासनाकडे राहील. यात्रेकरू, अमरनाथ बोर्ड आणि तपासणी यंत्रणा यांच्याकडे स्वतंत्र स्लिप असेल.

कडेकोट सुरक्षा

  • दक्षिण कश्मीरात 3880 मीटर उंचावर गुहेमध्ये अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात.
  • 1 जुलै ते 15 ऑगस्ट अशी 45 दिवस ही यात्रा चालणार आहे. अनंतनाग जिल्हय़ातील पेहलगाम आणि गनदेरबाल जिल्हय़ातील बालटाल या दोन मार्गानी यात्रेकरू दर्शनासाठी जातात.
  • या यात्रामार्गावर ‘सीआरपीएफ’चे जवान आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल. तब्बल 40 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.
  • हजारो वाहनांमधून यात्रेकरू येतात. प्रत्येक वाहनाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिप बसविली जाणार आहे.