गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी उकळली 40 हजारांची खंडणी

2253

गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने 40 हजारांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला. संबंधित अधिकारी सक्तीच्या रजेवर असतानाही त्याने गणवेशात सातारा जिल्ह्यात जाऊन खंडणीची रक्कम घेऊन पुण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी शासनाला अहवाल सादर केला आहे.

सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे असे खंडणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुण भुईंज शहरातील रहिवाशी असून तो व्यावसायिक आहे. 15 दिवसांपूर्वी त्याने भुईंज परिसरात गोळीबार केला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, तो फरार झाल्यामुळे त्याच्या मित्राकडे चौकशी सुरू होती. दीपक हुंबरे यापूर्वी भुईंज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी होते. त्यामुळे त्यांना येथील माहिती आहे. संबंधित पोलीस ठाण्यात बुवा म्हणून एक अधिकारी आहेत. त्यांची आणि हुंबरे यांची ओळख आहे. आठ दिवसांपूर्वी फिर्यादी तरूणाला गोळीबार प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी बुवा यांच्या कॅबिनमधून हुंबरे बाहेर निघाल्याचे फिर्यादी यांनी पाहिले होते. त्यानंतर काहीवेळाने तरूणाला फोन आला. त्याने डीवायसपी हुंबरे बोलत असून तुम्ही बसस्थानकावर या असा निरोप दिला. तरुण आणि त्याचा मित्र त्याठिकाणी गेले असता, हुंबरे यांनी त्यांना माझे बुवा यांच्याशी बोलणे झाले आहे. “तुम्हाला या प्रकरणात काही त्रास होणार नाही”. “माझे काय करता बोला” असे सांगितले. अन्यथा गुन्ह्यात अडकवावे लागेल अशी भीती दाखवत खंडणी मागितली. त्यांनतर दोघाकडून 40 हजार खंडणी घेतली. याप्रकरणी पुणे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

सक्तीच्या रजेवर असताना गणवेशात घेतली खंडणी

दीपक हुंबरे पुणे पोलीस दलात चर्चेत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कारनामामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. असे असताना त्यांनी गणवेशात जाउन खंडणी स्वीकारली असल्यामुळे दलात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या