धारावीसाठी रेल्वेच्या 45 एकर जागेची कुर्बानी,3800 कोटींचा व्यवहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

धारावीच्या पुनर्विकासासाठी आता रेल्वेची जमीन लाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या मालकीची माटुंगा-माहीम पट्टय़ात असलेली 45 एकर जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्टे करारावर 3800 कोटींना आंदण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका अडचणीत आल्याचा आरोप रेल्वे कामगार संघटनांनी केला आहे.

धारावीचा पुनर्विकास करण्याची राज्य सरकारची योजना आहे. या बकाल वस्तीचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत होत आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जमिनीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारचा डोळा रेल्वेच्या सुमारे शंभर एकर जागेवर होता. धारावीच्या पुनर्विकासाची योजना 240 एकरावर होणार असून ही योजना 22 हजार कोटींची आहे. राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनुक्रमे 17 एकर आणि 90 एकर जागेसाठी रेल्वेकडे तगादा लावला होता. माटुंगा-माहीम येथील रेल्वेच्या या जागेवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून उर्वरित जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कॉलनी तसेच क्रॅप यार्ड, आरपीएफचे ग्राऊंड आणि रेल्वेची ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट आहे.

पाचवी आणि सहावी मार्गिका बोंबलली…

मध्य रेल्वेला परळ आणि कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्यासाठी तसेच मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान सहावी मार्गिका टाकण्यासाठी तसेच अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी या जागेची अत्यंत निकड आहे. त्यामुळे या फाइलला हात लावण्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारच्या बैठकीत हा व्यवहार पक्का केला आहे. त्यात राज्य सरकारच्या मागणीप्रमाणे थेट 100 एकर जागा न देता रेल्वेची 45 एकर जमीन 99 वर्षांच्या लीजवर देण्याचे ठरले असून त्यासाठी 3800 कोटी रुपये रेल्वेला मिळणार आहेत.