मुख्यमंत्री, शिवसेना खासदारांना धमकी प्रकरण; आरोपी पलाशविरोधात 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दाऊदच्या नावाने धमकावणारा पश्चिम बंगालमधील माथेफिरू पलाश बोस याच्या विरोधात एटीएसच्या जुहू युनिटने शिवडी कोर्टात 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार काहीच करीत नाही. त्यामुळे तुम्ही आणि राज्य सरकारने सुशांत सिंह प्रकरणापासून दूर व्हावे अन्यथा परिणाम वाईट होतील, असे पलाश बोस याने दाऊदचा हस्तक असल्याचे सांगत धमकावले होते. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी व्हर्च्युअल कॉलद्वारे अशी धमकी दिली होती. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज व व्हॉइस कॉलच्या माध्यमातून धमकावले होते.

हे धमकीचे कॉल दुबईच्या नंबरवरून आल्याने याप्रकरणी एटीएसकडे तक्रार देण्यात आली होती. याची तत्काळ गंभीर दखल घेत एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक, एपीआय दशरथ विटकर, सचिन पाटील, सागर पुंजीर, उपनिरीक्षक अशोक राऊळ व पथकाने तत्काळ तपास हाती घेतला.

राज्यातल्या या बडय़ा नेत्यांना दाऊदच्या नावाने धमकावणारा इसम कोलकाता येथील असल्याचे समजताच पथकाने तेथे जाऊन पलाश बोस याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे दुबईचे सिमकार्ड सापडले. ज्या सिमकार्डवरून त्याने धमकावले होते. तो 15 वर्षे दुबईत जिम इन्स्ट्रक्टर म्हणून कामाला होता. तेव्हा घेतलेले सीमकार्ड तो हिंदुस्थानात आल्यानंतरही वापरत होता. पलाश सध्या कोठडीत असून याप्रकरणी दया नायक व पथकाने योग्य तपास केला आणि पलाशविरोधात सबळ पुराव्यानिशी 450 पानांचे दोषारोप पत्र शिवडी कोर्टात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या