
विद्यार्थीच मिळत नसल्याने या वर्षी म्हणजे 2019-20 या सत्रात आणखी 46 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत. यासोबतच गेल्या तीन वर्षांत बंद पडलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या 188 झाली आहे.
नव्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्यानेच महाविद्यालयांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. तशी तर गेल्या पाच वर्षांपासून अभियांत्रिकीची संख्या कमी होत चालली आहे; पण गेल्या तीन वर्षांत ही संख्या झपाटय़ाने घटत आहे. 2017-18 मध्ये 110 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडलीत. त्यानंतर मागील सत्रात 2018-19 मध्ये 32 तर चालू सत्रात 2019-20 मध्ये 46 महाविद्यालयांना कुलुपे ठोकण्याची वेळ आली. अशीच अवस्था व्यवस्थापन अभ्यासक्रमाचीही होत आहे. या अभ्यासक्रमासाठीही विद्यार्थी मिळेनासे झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, नोकऱ्यांचा अभाव. या क्षेत्रात फारच थोडय़ा नोकऱ्या उपलब्ध होत असतात. ‘एक अनार सौ बिमार’सारखी गत झाली आहे. नोकऱ्याच मिळत नसल्याने अभियांत्रिकीची घडी उद्ध्वस्त होत चालल्याचे बोलले जाते आहे.
बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करणार, या प्रश्नाच्या उत्तरात पूर्वी दहापैकी आठ विद्यार्थी अभिमानाने इंजिनीअरिंग असे सांगायचे . मुलगा-मुलगी इंजिनीअरिंगला आहे, याचे पालकांनासुद्धा कौतुक वाटायचे. मात्र, आता नोकरी, रोजगार मिळत नाही आणि व्यवसाय थाटता येत नसल्याने इंजिनीअरिंगच्या प्रवेशाकडेच विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. ते इतर अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहेत. गेल्या तीन वर्षांत महाविद्यालयांना पटापट कुलुपे ठोकली जात आहेत. व्यवस्थापन अभ्यासक्रमाचीही हीच गत आहे.
शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही
राज्यात उच्च शिक्षणाच्या दृष्टीने तीन राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची भर गेल्या पाच वर्षांत पडली. यात ट्रिपल आयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल असे चित्र रंगविण्यात आले. प्रत्यक्षात या संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतके राज्यातील विद्यार्थी समाविष्ट आहेत. त्यामुळे या संस्था राज्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळालेला नाही. याउलट विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक संस्थांना टाळे लावण्याची वेळ आली. यात विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्तीचा परतावा मिळत नसल्याचे कारणही महत्त्वपूर्ण ठरले. याच प्रकारातून महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढू लागल्याचे चित्र दिसून आले.





























































