रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी 474 लोकांचा मृत्यू होत असून 2023 या वर्षात तब्बल 1.73 लाख लोकांनी आपला जीव गमवला आहे, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कोणत्या राज्यात किती अपघात होतात, याची माहिती गोळा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला माहिती देण्यास सांगितल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू
सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सर्वात जास्त मृत्यू हे उत्तर प्रदेशात झाले आहेत. 2023 मध्ये उत्तर प्रदेशात 23,652 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तामीळनाडूमध्ये 18,347, महाराष्ट्रात 15,366, मध्य प्रदेशात 13,798 आणि कर्नाटकात 12,321 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात सर्वात जास्त जखमींची संख्या ही तामिळनाडूमधील आहे. या ठिकाणी 72,292 लोक अपघातात जखमी झाले आहेत. यानंतर मध्य प्रदेशात 55,769 आणि केरळमध्ये 54,320 लोक जखमी झाले आहेत.