
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
निवडणुकीत झालेला खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायत सदस्यांसह त्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या पावणे आठशे जणांवर निवडणूक लढविण्यावर ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच त्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात नुकतेच आदेश जारी केले आहेत.
२०१७ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर आणि २०१८ मधील मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुका लढवणाऱ्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्यांना निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक होते. मात्र या उमेदवारांनी खर्च सादर करण्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ मे २०१८ रोजी संबंधित उमेदवारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. अखेर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ५ डिसेंबर २०१८ रोजी ४८ ग्रामपंचायत सदस्यांसह ७७७ उमेदवारांवर ५ वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. या ७७७ उमेदवारांमध्ये निवडून आलेल्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश आहे.
या सदस्यांचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. या अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीवेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी या यादीतील नावे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना आता ५ वर्ष निवडणूक लढविता येणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी सांगितले.
तालुकानिहाय अपात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या
तालुका उमेदवार सदस्य
संभाजीनगर ५८ ०
वैजापूर ८७ १३
कन्नड १२१ १३
सिल्लोड ५१ ०
सोयगाव १८ ०
पैठण १८६ १
खुलताबाद १३ ०
फुलंब्री ५६ १३
गंगापूर १८७ ८
एकूण ७७७ ४८





























































