विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेची घोषणा होऊन राज्यात लवकरच आचारसंहिता लागू होण्याच्या धास्तीने मिंधे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या दोन तासांच्या बैठकीत तब्बल 49 पेक्षा अधिक निर्णय मंजूर करण्यात आले. यामध्ये मानधन भत्तेवाढ, अर्थसहाय्य, नव्या महामंडळाची व संस्थांची घोषणा तसेच असंख्य सवलतींच्या घोषणा करण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन आठवड्यांत लागण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यापूर्वी निर्णयांचा धडाका लावला आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 35 निर्णय घेतल्यानंतर आज झालेल्या बैठकीत 49 निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर अवघे सात विषय दाखविण्यात आले. हे सात विषयच सर्व मंत्र्यांना वितरित करण्यात आले. मात्र आयत्या वेळी अन्य विषय आणून एकूण 49 निर्णय घेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी सुमारे चाळीस निर्णयच जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य नऊ कोणते आहेत हे अद्याप पुढे आलेले नाही.
ग्राम रोजगार सेवकांना दरमहा प्रोत्साहन
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झाला. ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी 2 हजारांपेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहे, त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रुपये आणि 2 हजार 1 पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता आणि डेटा पॅकसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ
राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. राज्यातील 12 हजार 793 कोतवालांना या निर्णयांचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये इतक्या मानधनात 10 टक्के म्हणजे दीड हजार रुपयांची वाढ देण्यात येईल.
सोनार आणि आर्य वैश्य समाजासाठी महामंडळ
राज्यातील सोनार आणि आर्य वैश्य समाजासाठी संत नरहरी महाराज तसेच श्री. वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
आयटीआय संस्थेला अनंतराव पवार यांचे नाव
राज्यातील आणखी 26 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय त्यानुसार माळेगाव बुद्रुक जि. पुणे येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांचे नाव देण्यात येणार आहे.
मेट्रो-3 प्रकल्पग्रस्तांना मुद्रांक शुल्कात सवलत
मेट्रो-3 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली. गिरगाव आणि काळबादेवी स्थानकामुळे बाधित होणाऱ्या इमारतीमधील पात्र रहिवासी, भाडेकरू अशा प्रकल्पग्रस्तांना घरे देताना दस्तऐवजास एक हजार इतके कमी मुद्रांक शुल्क आकारून उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो प्रकल्प 3 मधील प्रकल्पग्रस्तांना आता केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
होमगार्डांच्या भत्त्यात वाढ
राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ 40 हजार होमगार्डंना होईल. सध्या या होमगार्डंना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. हा भत्ता आता 1 हजार 83 रुपये करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातील ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 हजार 220 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी 29 किलोमीटर असून, या मार्गावर 20 उन्नत स्थानके आणि दोन भूमिगत स्थानके आहेत.
सिद्धिविनायक मंदिर समितीवर आता 15 सदस्य
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून ती 15 करण्याचा तसेच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.