पंधरा वर्षांपासून शरीराची उजवी बाजू होतेय सुन्न, मेंदूत अडकलं होतं काहीतरी भयंकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीराची उजवी बाजू सुन्न होते, हात पाय गळून गेल्यासारखे वाटतात असा त्रास सहन करत त्याने 15 वर्ष काढली. आई वडिल अधू असल्याने हे काहीतरी जेनेटीक असल्याचे त्याला वाटले होते. मात्र जेव्हा डॉक्टरांनी त्याचे सिटीस्कॅन केले तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. त्या तरुणाच्या मेंदूत एक पाच इंचाचा किडा अडकला होता. डॉक्टरांनी किडा असल्याचे निदान 2015 साली केले मात्र तो किडा ऑपरेशन करून काढायला तब्बल पाच वर्षांनी मुहुर्त मिळाला.

चीन मध्ये राहणाऱ्या त्या तरुणाला तो 6 वर्षाचा होता तेव्हापासून हात पाय सुन्न पडत होते. पण सुरुवातीला आई वडिलांना सांगितले तेव्हा त्यांना तो आपल्यासारखाच अधू असावा असे वाटले. नंतर हा त्रास हळू हळू वाढत गेल्याने त्याने 2015 साली सीटीस्कॅन केले. त्याचे सीटीस्कॅनचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या मेंदूत एक किडा वळवळताना दिसला. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन करण्यास सांगितले. तो तरुण तयारही झाला. मात्र तो किडा अशा प्रकारे अडकला होता की त्यावेळी त्याचे ऑपरेशन करणे त्याच्या जीवावर बेतू शकले असते. त्यामुळे डॉक्टरांनी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र किडा काही जागचा हलत नव्हता. या महिन्यात डॉक्टरांनी त्याचे सीटीस्कॅन केले असता त्या किड्याने त्याची जागा बदलल्याचे दिसून आले. त्यानंतर तत्काळ 25 ऑगस्टला त्या तरुणावर शस्त्रक्रिया करून तो किडा तेथून काढण्यात आला.