
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी लहान रस्ते, झोपडपट्टी, गल्लीबोळात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात गेल्या 20 दिवसांत 5 हजार 786 मेट्रिक टन इतका कचरा आणि डेब्रिज गोळा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या स्वच्छता मोहिमेवर सहआयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त स्वतः जातीने हजर राहून पाहणी करत आहेत.
महापालिका आयुक्त-प्रशासक इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये आणि सर्व संबंधित खात्यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जात आहे. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे परिसर, विसर्जन स्थळे इत्यादी ठिकाणीदेखील अहोरात्र स्वच्छता राखली जात आहे.
संबंधित परिमंडळांचे सहआयुक्त, उपायुक्त तसेच सर्व प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त ‘ऑन द स्पॉट’ भेटी देत मुख्य रस्ते, हमरस्त्यांसह अगदी गल्लीबोळात जाऊन तेथील दैनंदिन स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. स्वच्छतेची पुनर्तपासणी केली जात आहे. गणेशोत्सवात भाविक, सर्वसामान्य, पर्यटक कुठेही फिरताना स्वच्छ शहराचा अनुभव घेता यावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.


























































