दारूची अवैध वाहतूक, खरेदी-विक्री केल्यास पाच वर्षे कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

संपूर्ण दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिह्यात अवैध मद्य व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात असलेल्या शिक्षेतील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता मद्याची वाहतूक, खरेदी-विक्री केल्यास तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये ते एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या तीन जिह्यांमध्ये दारूबंदी जाहीर केली आहे. अवैध मद्याच्या धंद्यात मोठय़ा प्रमाणात नफा होत असल्यामुळे या जिह्यांत सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या जिह्यातील अवैध मद्य उत्पादनासह त्यांची वाहतूक व विक्री या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींकडून तक्रारदाराला किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण केली जाते. त्यामुळे अवैध मद्य व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये सध्या असलेल्या शिक्षेतील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या निर्णयानुसार संपूर्ण कोरडे क्षेत्र आणि विहित मर्यादा यांची नव्याने व्याख्या करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दारूबंदी क्षेत्रात वाढीव शिक्षेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी तातडीने अमलात आणण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मान्यता देण्यात आली आहे.