पोलिसांवर हल्लाप्रकरणी 50 जणांना अटक; दगड, काठय़ा केल्या जप्त

पवईच्या तिरंदाज गाव येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून 50 जणांना अटक केली. त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांवर तेथील नागरिकांनी मिरचीचे पाणी आणि रॉकेल अंगावर टाकण्याची तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिरंदाज येथील भूखंडावर असलेल्या 500 झोपडय़ा तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आल्या होत्या. पवई येथील भूखंडावर कारवाईचे आदेश मानवी हक्क आयोगाने दिले होते. त्यानुसार नगर रचना अधिनियमन नुसार पालिकेने त्या झोपडपट्टय़ांना नोटीस दिली होती. गुरुवारी पोलीस आणि पालिकेचे पथक हे कारवाईला गेले.  कारवाईला गेल्यावर जमावाने अचानक पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या दगडफेकीत साकीनाका विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पवईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना दुखापत झाली. तसेच तेथील नागरिकांनी पोलिसांच्या अंगावर रॉकेल, मिरचीचे पाणीदेखील टाकले होते. एवढेच नव्हे तर, डब्यामध्ये दगड भरून ते पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांवरदेखील भिरकावण्यात आले. पालिकेचे कनिष्ठ अभियंता रोहन शेरावते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी 50 जणांना अटक केली.

महिला पोलिसाला कोंडून ठेवले

विकासकाकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली जमावाने एका महिलेच्या घरावर हल्ला केला. दगड, काठय़ा घेऊन ते महिलेच्या घरावर चालून गेले. हा प्रकार पवई पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अश्विनी ढमढरे यांच्या लक्षात आला. तेव्हा जमावाने ढमढरे यांच्या अंगावर बादल्या फेकून मारल्या. तसेच ढमढरे यांना एका रूममध्ये कोंडून ठेवले. तेव्हा पवई पोलीस ठाण्याचे विशाल खंडागळे, राहुल बोरसे तेथे गेले. ढमढरे आणि एका महिलेला बाहेर काढत असताना त्या जमावाने महिलेला मारहाण केली. महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीलादेखील दगड फेकून मारल्याने त्या मुलीच्या खांद्याला दुखापत झाल्याचे समजते.