दिल्ली पोलिसांनी 500 कोटींच्या अॅप घोटाळ्याप्रकरणी यूट्युबर एल्विश यादव आणि कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह अन्य तिघांना समन्स पाठविण्यात आले आहेत. पोलिसांना 500 हून अधिक तक्रारदार मिळाले आहेत. त्यात आरोप लावण्यात आला आहे की, अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि युट्युबर्स यांनी आपल्या पेजवर HIBOX या मोबाईल अॅप्लीकेशनचा प्रचार केला आहे आणि अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास आकर्षित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्याचा मुख्य आरोपी चेन्नई येथील शिवराम (30) याला अटक केले आहे. तक्रारीनुसार, सौरव जोशी, अभिषेक मल्हान, पुरव झा, एल्विश यादव, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, लक्ष्य चौधरी, आदर्श सिंह, अमित आणि दिलराज सिंह रावत यांच्यासह सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि युट्युबर्सनी या अॅपचा प्रचार केला आणि लोकांना या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास आकर्षित केले.
पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी म्हणाले की, HIBOX एक मोबाईल अॅप्लीकेशन आहे, जे एका नियोजित घोटाळ्याचा भाग होते. डीसीपी यांनी सांगितले की, या अॅपच्या माध्यमातून आरोपीने दरदिवशी एक ते पाच टक्के रिटर्न्स मिळणार असल्याची हमी दिली होती. जो एक महिन्यात 30 ते 90 टक्क्यांच्या बरोबर आहे. या अॅपला फेब्रुवारी 2024 मध्ये लॉन्च केले होते. या अॅपमध्ये 30 हजारहून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती. सुरुवातीच्या पाच महिने लोकांना चांगले रिटर्न्स मिळाले. मात्र जुलैपासून ॲपने तांत्रिक अडचणी, कायदेशीर समस्या, जीएसटी समस्या इत्यादी कारणांमुळे पेमेंट थांबवले.
16 ऑगस्ट रोजी, पोलिसांना 29 पीडितांकडून इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) मध्ये HIBOX अॅप्लिकेशनविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारदारांनी आरोप केला आहे की, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 20 ऑगस्ट रोजी, विशेष सेलने विविध कलमांनुसार आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला.