महापौर सुरेखा कदम यांनी प्रस्तावित केलेल्या 7.42 कोटींच्या 51 कामांना मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । नगर 

शहरातील विविध भागांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या व महापौर सुरेखा कदम यांनी महासभेत मंजूर केलेल्या ७.४२ कोटींच्या ५१ कामांसाठी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना व जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

महापौर कदम यांनी प्रस्तावित केलेल्या या कामांचे प्रस्ताव प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडले होते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते. मात्र, या कामांना आता मंजुरी मिळाली असून संपूर्ण शहरात प्रस्तावित असलेल्या अनेक विकासकामे यामुळे मार्गी लागणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, अमरधाममधील मान्सून शेड आदी महत्वाच्या कामांचाही यात समावेश असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.

नागरी क्षेत्रातील दलितेतर वस्ती सुधारणा योजना व जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत महापौर सुरेखा कदम यांनी विविध प्रभागांमधील कामे प्रस्तावित केली होती. दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ३.५१ कोटी रुपयांची २९ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यात रस्ता कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, सांस्कृतिक भवनाची उभारणी, ड्रेनेज लाईन, पावसाळी गटार आदी विविध कामे प्रस्तावित आहेत. तर सुवर्णजयंत्ती नगरोत्थान (जिल्हास्तर) या अंतर्गत ३.९१ कोटी रुपयांची २२ कामे प्रस्तावित आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय ते हातमपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते सीएसआरडी आदी प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण व रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाळी गटार करण्याचे महत्वपूर्ण काम समाविष्ट आहे. तसेच अमरधाम येथील दहन ओट्या समोरील जागेत मान्सून शेड उभारण्याचे कामही यात मंजूर करण्यात आले आहे.

शहराच्या इतर भागातील रस्ते, गटार, ड्रेनेज आदी विविध कामे यात मंजूर करण्यात आलेली आहे. या दोन्ही योजनांमधील कामांना प्रत्यक्ष निधी उपलब्ध झालेला असून, महासभेत या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या सर्व कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. आचारसंहितेमुळे या कामांना मंजुरी रखडली होती. आता या ७.४२ कोटींच्या कामांनाही मंजुरी मिळाली असल्याने ही सर्व कामे मार्गी लागणार आहेत.

महापौर पदाच्या कार्यकाळात अनेक योजनांमधून तसेच महापौर शहर विकास निधी व इतर निधींच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे मार्गी लावण्यात आली. आता शेवटच्या टप्प्यात मंजूर केलेली पावणे आठ कोटींची कामेही शहरात होणार आहेत. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लावल्याचे तसेच पाणी योजना, भुयारी गटार योजना आदी प्रमुख योजनांची कामे सुरु करण्यात आली होती. महापालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळेच शहरातील नागरिकांनी शिवसेनेच्या सर्वाधिक उमेदवारांना निवडून दिले व पुन्हा एकदा शिवसेनेला महापालिकेत सत्तेसाठी संधी दिली. नागरिकांच्या विश्‍वासाला पात्र राहून यापुढील काळातही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून अनेक विकासाची कामे मार्गी लागतील, असा विश्‍वास महापौर कदम यांनी व्यक्त केला.