ईव्हीएम बंद, लहान मुलांचे मतदान आणि भाजपसाठी बोगस वोटिंग, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 50 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱया 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी 52 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मतदान केंद्रात घुसले. अकलुजमध्ये एका उमेदवाराच्या लहान मुलाने चक्क ईव्हीएमचे बटन दाबून मतदान केले. पुणे जिह्यातील रांजणगावमध्ये तर भाजपसाठी बोगस मतदान करून घेण्यासाठी बाहेरून मतदार आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी जवळपास 20 जणांना आणण्यात आल्याची कबुली बोगस मतदानासाठी आलेल्यांनी दिली.

ईव्हीएममध्ये ‘बीप’ आवाज येईना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज येथील मतदान केंद्रावर एक तांत्रिक अडचण समोर आली. मतदारांनी मत दिल्यानंतर मशीनमधून येणारा ‘बीप’ आवाज येत नसल्याने एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत मतदान थांबवून ईव्हीएम मशीन बदलली.