नालायकांसोबत एनडीएत पुन्हा जाणार नाही! उद्धव ठाकरे यांनी मिंधे, भाजप आणि मोदी यांना फोडून काढले!

मिंधे आणि भाजपला माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो न लावता, शिवसेनेचं नाव न लावता आणि धनुष्यबाणाचं चिन्ह न लावता लढून दाखवा नाहीतर षंढ म्हणून गावात फिरा!

विजयी खासदारांसोबतच माझ्या योद्धय़ा उमेदवारांचाही सत्कार मी केला कारण मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. हे सरकार चालेल असं मला वाटत नाही. ते पडणारच आहे, नव्हे पडलंच पाहिजे.

मोदींना मी आमंत्रण देतोय. विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आतापासूनच सुरू करा. मग मी आहे आणि तुम्ही आहात. फक्त या षंढांना बाजूला ठेवा. नाव चोरायचे नाही. वडील चोरायचे नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा. नवी निशाणी घ्या. मिंध्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर… अरे माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राइक रेट सांगताय तुम्ही. षंढ कुठले!

लोकसभा निवडणुकीत भाजपला तडाखा बसला. त्यांची वरपासून खालपर्यंत फाटलीय. त्यामुळेच निवडणूक होताच उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार, एनडीएत परतणार असे बोलून गैरसमज पसरवत आहेत, असे नमूद करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तमाम शिवसैनिकांना जाहीर प्रश्न विचारला, ‘आता तुम्हीच मला सांगा, एनडीएमध्ये जायचे का, ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला. आपल्या मातेसमान शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांसोबत पुन्हा जायचे का?’ त्यावर नाही… नाही… असा आवाज संपूर्ण सभागृहातून घुमला. त्यावर शिक्कामोर्तब करत भाजपने त्यांचं काय काय उघडं पडलंय ते बघावे, ते आमचं कशाला वाकून बघताहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात षण्मुखानंद सभागृहात बुधवारी साजरा झाला. शिवसेनेचा तोच दरारा आणि तोच धाक यावेळी दिसला. या सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक, आगामी विधानसभा निवडणूक यावर सडेतोड भूमिका मांडताना भाजप आणि मिधेंची सालटी काढली. उद्धव ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणावर शिवसैनिकांनी टाळय़ा आणि जयघोषाने षण्मुखानंद दणाणून सोडले.

जमलेल्या माझ्या तमाम मर्द, लढवय्या शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो… लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा आजचा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेनेला किती वर्षे झाली हे महत्त्वाचे नाही, शिवसेना म्हटल्यावर नवचैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्या देशभक्तांचे त्यांनी पुन्हा एकदा यावेळी आभार मानले. शिवसेनेच्या वतीने सर्व मराठी, हिंदू, मुस्लिम, दलित, शीख, बौद्ध या सगळय़ा धर्मांच्या बांधवांनी साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपले कोण आणि परके कोण, शिवसेनेला कोण संपवायला निघालाय हे आपल्याला या निवडणुकीत कळाले याचाही त्यांनी उल्लेख केला. निवडणुकीतील विजयाचे श्रेय मला देता, पण यशाचे खरे मानकरी, यशाचे धनी तुम्ही आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांचे कौतुकही केले.

मोदींमध्ये अहंकार ठासून भरलाय

आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱयात कुठेही जा, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी वृत्तीवर निशाणा साधला. एखादी गोष्ट मी करू शकतो, भारतीय जनता पक्षाला पाडू शकतो हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे आणि जगामध्ये फक्त मीच ती गोष्ट करू शकतो हा अहंकार आहे, जो मोदींमध्ये आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

भुजबळ शिवसेनेत जाणार अशीही बोंब भाजपने उठवली. त्याबाबत मला प्रश्न विचारले गेले. मी भुजबळांशी बोललो नाही, भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत मग कशाला या नस्त्या उचापत्या करता, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला केला. भुजबळ मंत्री आहेत, ते त्यांच्या वाटेने चाललेत, शिवसेना आपल्या वाटेने चाललीय, पण भाजपवाले ती सांगड घालून त्यांचे अपयश झाकून ठेवायचा प्रयत्न करतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अनेक संस्थांनी लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, रवीश कुमार, ध्रुव राठी, हेमंत देसाई असे अनेक त्यामध्ये होते. या सर्वांनी आघाडीला मतदान करण्यासाठी प्रचार केला. त्यावर मिंध्यांनी आरोप केला होता की तो शहरी नक्षलवाद आहे. हुकूमशाही तोडून फोडून लोकशाही वाचवणे हा प्रचार म्हणजे मिंध्यांना नक्षलवाद, आतंकवाद वाटत असेल तर मी आतंकवादी आहे. लोकशाही वाचवणे, संविधान वाचवणे आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले. केंद्रात बसलेले भाजपचे बापजादे मोदी आणि शहा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करताहेत. शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय पाठवताहेत. दमदाटय़ा करून, तुरुंगाची भीती दाखवून, पैशाची लालूच दाखवून भाजपवाले विरोधी पक्षाच्या लोकांना स्वतःच्या पक्षात घेत असतील, सरकारे पाडत असतील तर हा नक्षलवादच आहे, हा लोकशाहीची हत्या करणारा शासकीय नक्षलवाद आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘पुन्हा येईन म्हणणारे आता गाताहेत, मला जाऊ द्या ना घरी…’

उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही खिल्ली उडवली. पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणणारे आता गाणे गाताहेत, जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभागृह हशा आणि टाळय़ांनी दुमदुमले. बारा वाजवले आहेत तरीही भाजपला राज्याचा सत्यानाश करायचा आहे, कुणाचीही महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाही असे मिंधे सरकार चाललेय, असे ते म्हणाले.

नखे उपटली तरी मुनगंटीवार लंडनला चाललेत

चंद्रपुरातील जनतेने सुधीर मुनगंटीवार यांची नखे उपटली तरीही ते आता लंडनला शिवरायांची वाघनखे आणायला चाललेत, असे सांगतानाच, भगव्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दार अवलादींची शिवरायांची वाघनखे आणण्याची पात्रता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात छत्रपतींचा भगवा होता, त्यावर कुठलेही चिन्ह नव्हते. पण भाजपने भगव्यात छेद केला, अशी टीका त्यांनी केली.

मंत्र्यांना पक्षाच्या कामाला जुंपले तर अपघात होणारच

भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या मंत्री म्हणून नालायक ठरलेल्यांना आता महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे, महाराष्ट्रात ते खालसा होणारच आहेत, पण अशा प्रकारे मंत्र्यांना पक्षाचे काम देणार असाल तर देशाचे काम करणार कोण? मंत्र्यांना पक्षाच्या कामाला जुंपलात तर अपघात होणारच, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेच्या न्यायालयात शिवसेना आपली लढाई जिंकली आहे. मात्र केंद्रातील सरकार पडलेच पाहिजे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काटय़ाच्या अणीवर वसली तीन गावे,एकही वसेचि ना, असे नागपूरच्या अधिवेशनात फडणवीस म्हणाले होते. आता ती रेकॉर्ड काढून त्यांनीच ऐकावी असा खोचक सल्ला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

विधान परिषदेच्या जागा जिंकल्याच पाहिजेत

शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही जागा आपण जिंकल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे नाशिक शिक्षक मतदारसंघातही विजय मिळालाच पाहिजे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. आता थांबायचे नाही. शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही, असे ते म्हणाले.

यावेळी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते. विधीमंडळ गटनेते अजय चौधरी, आमदार संजय पोतनीस, सुनील शिंदे, उपनेते सचिन अहिर, अमोल किर्तीकर, सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, आदेश बांदेकर, साईनाथ दुर्गे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, उपनेत्या सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, माजी महापौर महादेव देवळे, विलास पोतनीस, आमदार राजन साळवी, दगडू सकपाळ, मनोज जामसुतकर आदी उपस्थित होते.

भगव्या झेंडय़ावर कुठलेच चिन्ह छापू नका

शिवसेनेचा भगवा झेंडा हा भगवाच दिसला पाहिजे. हा शिवरायांचा भगवा आहे. साधुसंतांचा भगवा आहे. वारकऱ्यांचा भगवा आहे. फडकणारा भगवा झेंडा हा मशालीच्या धगधगत्या ज्वाळेशी साधर्म्य साधणारा आहे. शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ावर इतर कोणतेही चिन्ह छापू नका. आपल्या मशालीचा वेगळा प्रचार करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

भाजपची फाटलीय

गैरसमज पसरवून स्वतःचे अपयश झाकून ठेवतेय. भाजपने त्यांचे काय उघडे पडलेय ते पाहावे. दुसऱ्याचे वाकून पाहू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर उपस्थितांमधून भाजपची फाटलीय अशी प्रतिक्रिया उमटली. फाटलीय… माझी पंचाईत होते की थोडी घराण्याची भाषा आपोआप येते, पण सभ्यतेचा शिक्का माझ्यावर मारल्यामुळे समानार्थी शब्द शोधावा लागतो. पण आता फाटल्याला दुसरा समानार्थी शब्द नाही. आता फाटलीय ती फाटलीच आहे. पण ते नाही झाकून ठेवायचे, अशी कोटी उद्धव ठाकरे यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले

काँग्रेससोबत गेल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आरोप भाजपकडून केला जातो. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी शिवसेनेला मतदान केले म्हणून आम्ही हिंदुत्व सोडले, मुसलमानांच्या बाजूने लागलो असे भाजप म्हणत असेल तर मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे असा माझा ठाम आरोप आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासाठी 2014 आणि 2019 मधील एनडीएचे फोटो बघितले तर त्यांच्यासोबत कोण बसलेत ते कळेल, असे सांगतानाच, आज एनडीएबरोबर सत्तेत बसलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

चंद्राबाबू, नितीशकुमारांनी मुस्लिमांना वचने दिली नाहीत का?

उद्धव ठाकरे यांनी यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी आंध्र व बिहारमध्ये मुस्लिम समाजाला जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांचा दाखलाही यावेळी दिला. आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लिम समाजाला आश्वासने दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी मुस्लिम समाजाला वचने दिलेली नाहीत का, असा सवाल त्यांनी भाजपला केला. मुस्लिम समाज शिवसेनेबरोबर आहेच, कारण शिवसेना वार करेल तर समोरून करेल, भाजपसारखी पाठीत वार करणारी शिवसेनेची अवलाद नाही हे मुस्लिम समाजाला माहीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेवर आरोप करणाऱ्या भाजपवाल्यांचे स्वतःच टोप्या घातलेले कितीतरी फोटो आहेत, असे ते म्हणाले.

अपात्र आमदार मतदान कसे करू शकतात?

विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आमदार मतदान करतात. पण ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते गद्दार आमदार निवडणुकीत मतदान कसे करू शकतात? निवडणूक प्रक्रिया सुरू केलीच कशी? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगाला उद्देशून केला. आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेनेचा निर्णय व्हायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आणखी किती वेळ घेणार आहात? ते 40 आमदार अपात्र झाले तर निवडणूक होऊ शकेल का? जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? न्यायालयाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे. पण, त्याला विलंब लागत असेल तर कसे चालेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंवर निशाणा… ‘बिनशर्ट’ पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. उद्धव ठाकरे नकोत म्हणून काहींनी एनडीएला ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला होता, असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर, उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, असे स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी देताच सभागृहात आणखी खसखस पिकली. काहींनी भाजपला विरोध करण्याचे नाटक करून, लढण्याचे नाटक करूनही पाठिंबा दिला असे सांगत उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीलाही टोला लगावला.

नड्डाजी नड्डा संभालो!

नेशन वॉण्ट्स टू नो. का तुम्ही हिंदुत्व सोडलं. का तुम्ही लाचार झालात. पुछता है भारत… नाही आता पुसता है भारत. त्यांना भारत पुसून टाकतो आहे. पुढच्या निवडणुकीत यांचं नामोनिशाण ठेवायचं नाही. जे नड्डा निघाले होते आपल्याला नडायला. फक्त भाजपाच शिल्लक राहील, असे म्हणत होते. नड्डाजी आपका नड्डा संभालके रखो. या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले. शिवसेना त्या सगळ्यांना पुरून उरलेली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यानी केला.

शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ

2024 ते 2026 साठी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि खासदारांनी सदस्य नोंदणी अर्जावर स्वाक्षऱया करून त्याची सुरुवात केली.

(फटकारे)

मला अभिमान आहे, यावेळेला आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढेही वापरणार नाही. मोदींचा तर अजिबात वापरणार नाही.

हार-जीत होत असते. निवडणूक हरलो तरी उद्या जिंकेन. पण हिंमत हरलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिंमत हरणार नाही. तुम्हाला हिंमत हरू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेन. जिव्हारी लागलाय माझ्या पराभव. या पराभवाचा वचपा काढणार. तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. आज ही शपथ मी घेतोय.

हुकूमशाही तोडा-मोडा, फोडून टाका आणि लोकशाही वाचवा हा प्रचार म्हणजे नक्षलवाद वाटतो तुम्हाला. हा आतंकवाद वाटतो? मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. देश वाचवा, देशाचं संविधान वाचवा सांगणं हा आतंकवाद असेल तर होय मी आतंकवादी आहे.

दमदाटय़ा करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही लोकांना पक्षामध्ये घेता. सरकारं पाडता. पैशांचं लालूच दाखवता. हा तुमचा शासकीय नक्षलवाद आहे का? सत्तेचा दुरुपयोग करायचा, विरोधी पक्ष फोडायचे, चांगली चाललेली सरकारे पाडायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन गद्दारांना मंत्रीपदे द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक असा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे.