हिंदुस्थानात परत जा! आयर्लंडमध्ये 6 वर्षीय चिमुकलीला टोळक्यानं घेरलं; प्रायव्हेट पार्टवर केले वार

विदेशामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटनसह आता आयर्लंडमध्येही हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. 19 जुलैला आयर्लंडमधील डल्बिन येथे हिंदुस्थानी व्यक्तीवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता असाच प्रकार वॉटरफोर्ड येथे घडला आहे. येथे हिंदुस्थानी वंशाच्या 6 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलांना हल्ला केला आहे. हिंदुस्थानात परत जा, असे म्हणत हल्लेखोरांनी चिमुकलीच्या गुप्तांगावरही वार केले.

ही घटना 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. चिमुकली समवयस्क मित्रांसोबत घराबाहेर खेळत असताना अल्पवयीन मुला-मुलींच्या टोळक्याने तिला हिंदुस्थानात परत जा असे म्हणत मारहाण केली. तिच्या प्रायव्हेट पार्टवर सायकल घातली, तिच्या चेहऱ्यावरही गुद्दे घातले. हल्लेखोर मुलं 12 ते 14 वयोगटातील असून यात 8 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पीडितेची आई नर्स असून गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये रहात आहे. नुकतेच तिला आयरीश नागरिकत्वही मिळाले आहे. तिला 10 महिन्यांचा मुलगाही आहे. तो रडत असल्याने मी घरात गेले. बाळाला दूध पाजत असताना मुलगी घाबरलेल्या स्थितीत घरात आली. ती रडत होती, बोलतही नव्हती, असे पीडितेच्या आईने सांगितले.

मुलीच्या मैत्रिणीने तिच्यासोबत काय घडले हे सांगितले. मोठ्या मुलांच्या टोळक्याने तिच्या गुप्तांगावर सायकल घातली आणि तोंडावर गुद्दाही घातला, असेही पीडितेच्या आईने सांगितले. तसेच आम्हाला येथे आता सुरक्षित वाटत नसून माझी मुलगी घराबाहेर खेळण्यास घाबरत आहे. मुलांचे टोळके आमच्या घराबाहेरच घुटमळत राहत असल्याचेही पीडितेची आई म्हणाली.

दरम्यान, पीडितेच्या आईने आयरीश पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र मुलांना कडक शिक्षेची मागणी तिने केलेली नाही. त्याऐवजी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे. सरकार यावर काय निर्णय घेईल माहिती नाही. मात्र आम्ही येथे कामगार कमी असल्याने कामाला आलेलो आहोत. आमच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रही असल्याचे पीडितेच्या आईने सांगितले.