गडचिरोलीत 61 नक्षलवादी आले शरण, पोलीट ब्युरोचा सदस्य भुपतीचेही आत्मसमर्पण

गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीला आजवरचा सर्वात मोठा दणका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिह्यात हिंसक कारवाया करणाया नक्षलवाद्यांपैकी तब्बल 61 जणांनी शरणागती पत्करली आहे. यात चळवळीचा प्रमुख चेहरा सोनू उर्फ भूपती याचा समावेश आहे. त्यामुळे नलक्षवाद्यांचा कणाच मोडल्याचे बोलले जात आहे.

सोनू ऊर्फ भूपतीचे मूळ नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव असे आहे. तो माओवाद्यांच्या संघटनेचा पोलिट ब्युरोचा आणि केंद्रीय समितीचा सदस्य आहे. तो 69 वर्षांचा असून वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. चळवळीतील एक महत्त्वाचा चेहरा अशी त्याची ओळख आहे. गेल्या 40 वर्षांपासून संघटनेत सक्रिय असलेला भूपती महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांची जबाबदारी होती. त्याला पकडण्यासाठी सरकारने सहा कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच भूपतीने केंद्र सरकारला चर्चेसाठी व तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते.

भाऊ मारला गेला, पत्नीचे आत्मसमर्पण

माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर भूपती हा संघटनेच्या सर्वोच्च पदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा भाऊ किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) 2011 मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता. भूपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात आहे.