‘मार्मिक’चा आज 64 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

स्थळ -शिवाजी मंदिर, दादर

वेळ – सायंकाळी 6 वाजता

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाला ‘मार्मिक’ साप्ताहिकातून वाचा फोडली. कुंचल्यांचे फटकारे आणि मर्मभेदी व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. त्याबरोबरच मराठी माणसामध्येही आत्मविश्वास वाढवला होता. त्या ‘मार्मिक’चा उद्या, 13 ऑगस्ट रोजी 64 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये दिमाखदार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळय़ाला शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘मार्मिक’चे संपादक उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 6 वाजता वर्धापन दिन सोहळय़ाला प्रारंभ होणार आहे. या वेळी ‘मार्मिक’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेला दणदणीत विजय, सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या सोहळय़ानिमित्त मिंधे सरकारवर काय फटकारे ओढतात याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे.

वर्धापन दिनानिमित्त ‘दे धमाल मर्डर मिस्ट्री मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचा खास प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाची तिकिटे शिवसेना भवन येथे  उपलब्ध आहेत. तरुण व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी गेल्या चार वर्षांत ‘मार्मिक’मध्ये साकारलेल्या निवडक मुखपृष्ठांचे नवे फटकारे हे प्रदर्शनही शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. 15 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या वर्धापन दिन सोहळय़ासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले आहे.