इंटरकॉण्टिनेंटल आंदोलन प्रकरण; 65 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

सामना ऑनलाईन । मुंबई

सहार येथील हॉटेल इंटरकॉण्टिनेंटल व्यवस्थापनाच्या मनमानी आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ 2009 साली करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल खटल्यातून शिवडी येथील सत्र न्यायालयाने आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्यासह एकूण 65 शिवसैनिकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश पंकज देशमुख यांनी या सर्वांची निर्दोष मुक्तता करताना त्यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्वच आरोप निराधार ठरवले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या शिवसैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हॉटेल इंटरकॉण्टिनेंटल या पंचतारांकित हॉटेलात काम करणार्‍या 21 कर्मचार्‍यांनी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने या 21 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. हॉटेल व्यवस्थापनाच्या या मुजोरीविरोधात शिवसैनिकांनी 21 जानेवारी 2009 रोजी आंदोलन छेडले. तसेच व्यवस्थापनाला जाब विचारला.

यावेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी सहार पोलिसांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार ऍड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्यासह एकूण 65 शिवसैनिकांना अटक केली. तसेच त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143 ते 149, 323, 324, 452, 508, 506 या कलमांखाली गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला भरला.

या खटल्याची सुनावणी तब्बल साडेनऊ वर्षे चालली. आज अंतिम सुनवणीवेळी सीनियर काऊन्सिल ऍड. सुहास घाग यांनी शिवसैनिकांची बाजू मांडताना हॉटेल व्यवस्थापनाचे सर्वच आरोप फेटाळून लावले. तसेच पोलिसांनी शिवसैनिकांवर सूडबुद्धीने कारवाई केली असा जोरदार युक्तिवाद केला.

शिवसैनिकांनी जमावबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याचा पोलिसांनी आरोप केला होता, परंतु तो आरोपही ऍड. घाग यांनी अमान्य केला. या आंदोलनाबाबत पोलिसांना लेखी कल्पना देण्यात आली होती, परंतु त्यावेळी पोलिसांनी जमावबंदी लागू असल्याची कोणतीही माहिती शिवसैनिकांना दिली नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीने काय गुन्हा केला याचीही पोलीस दफ्तरी कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही हेदेखील ऍड. घाग यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले. ऍड. घाग यांच्या प्रभावी युक्तिवादाची दखल घेऊन सत्र न्यायाधीश पंकज देशमुख यांनी सर्वच 65 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ऍड. डोळस यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.