
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरात शुक्रवारी 24 तासांत चार वेगवेगळ्याठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या एन्काऊंटरमध्ये एका 10 वर्षीय निष्पाप बालकालाही आपले प्राण गमवावे लागले. बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी शुक्रवारी ठार झाले, तर बंदीपोराच्या हाजीन भागात पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तोयबाचा कमांडर अली भाई हा मारला गेला.
इंटरनेटवर बंदी
खबरदारीची उपाययोजना म्हणून शोपियन, सोपोरे आणि दक्षिण कश्मीरच्या काही भगात इंटरनेट सेवा बंद केली. तर काही ठिकाणी ही सेवा टू-जीवर आणण्यात आली होती. या काळात सोपोरेमधील शैक्षणिक संस्थाही बंद होत्या.
ओलीस मुलगा ठार
हाजीन भागात दहशतवाद्यांनी एका 10 वर्षीय मुलाला ओलीस ठेवले होते. या वेळी झालेल्या चकमकीत या निष्पाप बालकाला आपले प्राण गमवावे लागले. दुसरीकडे शोपियन जिल्ह्यात रातनीपोरा भागात झालेल्या जोरदार चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातले. रातनीपोरामध्ये एका घरात अनेक दहशतवाद्यांना या वेळी जवानांनी गोळीबाराच्या सारख्या फैरी झाडून रोखून धरले. याच दरम्यान सोपारेच्या वारपोरा भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.




























































