अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्षांचा सश्रम कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील तिनचारी कोकमठाण येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुबेर करीम पठाण याला कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी.भागवत यांनी सात वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑगस्ट 2016 मध्ये घडली होती.

पीडित मुलगी शिर्डीतील सार्ईबाबा कॉलेजमध्ये 11 वी विज्ञान शाखेत शिकत होती. 16 ऑगस्ट 2016 रोजी पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली ती घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने ती हरवल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. कॉलेज सुटल्यानंतर आरोपी जुबेर करीम पठाण याने मुलीला मित्रमैत्रिणींच्या मदतीने रिक्षात बोलावून घेतले. जुबेरने रिक्षा त्याच्या घरी नेली, तिथे जुबेरच्या आईने विरोध केल्यामुळे तो मुलीला घेऊन नाशिकमार्गे पनवेलहून  मुंबईला गेला व त्याच्या मित्राच्या घरी थांबला. 18 व 19 ऑगस्ट 2016 रोजी जुबेरने तिच्यावर अतिप्रसंग केला व या  मुलीला त्याने शिर्डी येथे आणून सोडले. मुलीने घरी आईला झालेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर मुलीच्या आईने पुरवणी जबाब देवून जुबेर करीम पठाण (रा.तिनचारी कोकमठाण) याच्याविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेले व तिच्यावर वेळावेळी अत्याचार केल्याबद्दल शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  मुलीचा यावेळी जबाब घेण्यात आला. तपासात जुबेरने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले या प्रकरणी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी.भागवत यांच्यापुढे खटल्याची सुनावणी झाली. त्यात आरोपी जुबेर पठाण हा दोषी असल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.