पालघर जिल्ह्यात 705 हेक्टर भातशेतीचा चिखल; 350 गावांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. ७०५ हेक्टर भातशेतीचा चिखल झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील ३ हजार २६६ शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे पीक आडवे पडले. काढणीला आलेले पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून वहात आहेत ते फक्त अश्रू. दरम्यान लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपूर्ण पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपले. डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३५० गावे बाधित झाली असून सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचा भात पुरात वाहून गेला आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यांमधील भाताचे पीकदेखील भुईसपाट झाले आहे. रायगड जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचा अधिकृत आकडा अद्यापि जाहीर झाला नसला तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

डहाणूतील पुरात शेतकरी वाहून गेला
डहाणू तालुक्यातील कळंबदेवी परिसरात राहणारा सदानंद भुरभुरा (५५) हा शेतकरी पुरात वाहून गेला आहे. रविवारी सकाळी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी तो गेला होता. त्यानंतर घरी परतताना नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. त्यातूनच नदी ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना पाय घसरला आणि तो प्रवाहात वाहून गेला. आज सकाळी कळंबदेवी येथील शिरोंडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये सदानंदचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

देवीदर्शनासाठी गेलेल्या महिलांच्या दोन बस पुरात अडकल्या; 66 जणींची सुखरूप सुटका

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलांच्या दोन बसेस पुरामध्ये अडकल्या. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस तसेच आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी यांच्या मदतीने एकूण ६६ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. देवीच्या कृपेमुळेच आपण वाचलो, अशी भावना या महिलांनी व्यक्त केली. वसईहून 16 महिला खासगी बसने डहाणूजवळील आशागड येथील देवीच्या दर्शनसाठी रविवारी जात होत्या. मुसळधार पावसामुळे चरी नदीला पूर आला आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नदीकाठच्या रस्त्याने जात असताना बस पाण्याच्या प्रवाहात अडकली. रात्री उशिरा या महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली.

आमदार विनोद निकोले यांनीही तातडीने फोन करून आपल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी पाठवले. वसईतील महिलांची दुसरी खासगी बस बोईसरमार्गे डहाणू येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाली होती. त्यात ५० महिला व काही लहान मुलीदेखील होती. ही बस वाणगाव-चारोटी या मुख्य रस्त्यावरील पिंपळशेत येथे पुराच्या कचाट्यात सापडली. त्यांना बाहेर पडणे मुश्कील झाले होते. लहान मुले व महिला या प्रचंड घाबरल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांना रात्री उशिरा ही माहिती समजताच तातडीने पोलिसांचे पथक घेऊन दाखल झाले आणि सर्व महिलांना पुरातून बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील ५० घरांचे नुकसान झाले आहे. तलासरी तालुक्यातील वडवली, हडळपाडा येथे राहणारे ३६ ग्रामस्थ पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मासवण-खरशेत या गावामध्ये घरावर वीज कोसळून सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावून नेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सावर्डे-मोखाडा येथील शेतकरी हनुमंत पादीर यांनी केली आहे.

शहापूर तालुक्यातील चेरपोली, कांबा, उंबरमाळी, दहीगाव, टेंभा, सरळलाबे, वासिंद येथील भातशेतीमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी तर भातच वाहून गेला आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी केली आहे.

गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला; कार पुरात फसली
नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दोन ओला कार गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने मुख्य रस्ता सोडून पुराच्या पाण्यात अडकल्या. या दोन्ही कारमध्ये जवळपास पाच प्रवासी व दोन चालक असे एकूण सात प्रवासी होते. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने या सातही प्रवाशांची सुखरूप सुटका केली आहे. नाशिक येथे राहणाऱ्या प्रवाशांनी भांडुप येथे जाण्यासाठी दोन ओला कार बुक केल्या. गाडी भिवंडी येथे पोहोचली असता गुगल मॅपने चालकाला बापगाव सोनाळे मार्ग सुचवला. या रस्त्याने पुढे जात असताना लोनाड चौधरी पाडा येथील एपीएक्स कंपनीजवळ या दोन्ही गाड्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकल्या. दरम्यान जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व सर्वांची मुक्तता केली.