म्हाडाला 2,640 सदनिकांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना! 75 हजार अर्जदार घरासाठी वेटिंगवर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील २,६४० घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने मार्च महिन्यात अर्जनोंदणीला सुरुवात केली होती. परंतु जून महिना संपत आला, तरी लॉटरीची तारीख जाहीर न झाल्यामुळे हजारो अर्जदारांची निराशा झाली आहे. म्हाडाला लॉटरीसाठी मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल आता अर्जदारांकडून विचारला जाऊ लागला आहे. विविध उत्पन्न गटांसाठी असलेल्या या घरांसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने ३० मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २,६४० घरांसाठीची सोडत मार्चमध्ये जाहीर केली होती.

तारीख पे तारीख

सुरुवातीला १५ मे रोजी सोडतीची तारीख निश्चित केली होती. परंतु अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद न आल्यामुळे अर्ज नोंदणीस मुदतवाढ देऊन संगणकीय सोडत ५ जूनला काढण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाकडून कळविण्यात आले. परंतु निवडणुका होऊन आठवडा उलटला, तरी म्हाडाकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.