चोरीच्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी राबविलेल्या तपास मोहिमेत विना नंबरप्लेटच्या 150 पैकी 129 दुचाकींवर कारवाई करून 75 हजार 500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. 21 वाहनांची कागदपत्रे सादर न केल्याने ही वाहने जप्त करण्यात आली.
राहुरी भागात चोरीच्या दुचाकी अल्पदरात घेऊन वापर होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शनिवारी पाण्याची टाकी तसेच जुने बसस्थानक (बारागाव नांदूर) रोडवर पोलिसांनी तपासणी मोहीम राबविण्यात आली. कारवाई केलेल्या दुचाकींची कागदपत्रे बघून नंबरप्लेट बसविल्यानंतर 129 वाहने मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. या वाहनचालकांकडून 75 हजार 500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राबविण्यात आलेल्या मोटारसायकल तपासणी मोहिमेत 5 पोलीस अधिकारी, 10 पोलीस, 15 होमगार्डचा सहभाग होता.
राहुरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात. जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही. तसेच नागरिकांनी नंबर प्लेट बसविल्याने चोरीच्या वाहनाचा शोध घेणे सोपे होईल.
– संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, राहुरी.