पत्नीच्या मृत्यूचे दुःख अनावर; जालन्यात 75 वर्षांच्या शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरीजवळ असलेल्या लखमापूरी येथील शेतकरी पांडुरंग विश्वनाथ भापकर (वय 75) यांनी स्वतःच्या शेतात लखमापुरी शिवारात गट नंबर 75 मध्ये जाळून घेत आत्महत्या केली.

चार दिवसांपूर्वी भापकर यांच्या पत्नी आसराबाई भापकर यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. पत्नीचा शोक अनावर झाल्याने त्यांनी रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात जाळून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण चौधरी, पोलीस जमादार नामदेव चव्हाण यांनी केला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास भोजने व ज्ञानेश्वर मोरे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.