
मुंबईतील अनुदानित शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 11 हजार शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याच बरोबरीने खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 4500 शिक्षक व कर्मचारी अध्यापनाचे कार्य करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेने आपल्या शिक्षकांना 2019 पासून सातवा वेतन आयोग थकबाकीसह लागू केला आहे; मात्र त्यांच्याच बरोबरीने शैक्षणिक कार्य करणाऱ्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवले आहे. खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 90 टक्के महिला शिक्षिका कार्यरत आहेत. त्यामुळे महिला दिनापूर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.























































