
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशभरात नोकऱयांची बोंबाबोंब सुरू आहे. वेगवेगळय़ा कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करीत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना नोकरी गमवावी लागत आहे. अन्य उद्योगांप्रमाणे आता हिऱयांच्या व्यवसायावरसुद्धा मंदीचे संकट घोंगावले आहे. गुजरातमधील सुरत येथील 8 हजार हिरे कारखाने आर्थिक संकटाचा सामना करत असून मंदीच्या संकटामुळे 15 लाखांहून अधिक रोजगारांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन वर्षांत हिऱयाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. एक लाखाचा हिरा आता 65 ते 70 हजार रुपयांना मिळत आहे. कच्च्या हिऱयाच्या किमतीसुद्धा 25 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱयांना 10 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. हिऱयाचा व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून मंदीच्या कचाटय़ात सापडला आहे.
हिऱयाबद्दल लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात जुन्या हिऱयांना मूळपेक्षा कमी किंमत मिळाली तर सोन्याला जास्त भाव मिळाला. चिनी लोक हिऱयांऐवजी सोन्याचे दागिने खरेदी करत होते. सध्या मंदीमुळे अमेरिकन लॅबग्रोन हिरे विकत घेत आहेत, मात्र अमेरिकन बाजार सुधारल्यानंतर नैसर्गिक हिऱयांची मागणी पुन्हा वाढेल, असा हिरे व्यापाऱयांचा अंदाज आहे.
युद्धाचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध, हमास, लेबनॉनमधील युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेसह बाजारात मंदीचे सावट आहे. ज्याचा परिणाम सुरत आणि मुंबईसह देशातील हिरे उद्योगावर झाला आहे. सुरतमध्ये 8 हजार छोटे-मोठे कारखाने हिऱयांना पैलू पाडतात आणि पॉलिश करतात. यापैकी बहुतेक कारखाने सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.