81 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार, 40 हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा

गोरेगाव येथे  एआयआयएफएच्या (आयफा) वतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘स्टीलेक्स 2025’ या स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने नऊ कंपन्यांशी 80 हजार 962 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे  सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले. या करारामुळे राज्यात 40 हजार 300 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांतून  5 हजार 135 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून  5 हजार 500 रोजगार उपलब्ध होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल ऍडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे 5 हजार 440 कोटींची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली ऍडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारले जाणार आहे.

वर्धा येथे रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि.चा 25 हजार कोटी गुंतवणुकीचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा 41 हजार 580 कोटींचा स्टेनलेस स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.