9 कोटीचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने कारवाई करून सुमारे 9 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केले आहे. दृग्ज प्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली असून एकाला ताब्यात घेतले आहे. एका ड्रग्ज तस्कराची माहिती एनसीबी मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने वसई येथून मुस्ताक अहमदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन किलो पीसीपी जप्त केले. त्याच्या चौकशीत एस. के सौरभचे नाव समोर आले. एनसीबीने बुधवारी सौरभकडून 29 किलो एमडीए जप्त केले. सौरभच्या चौकशीत अतुल खानिवडेकरचे नाव समोर आले. अतुलची एनसीबीने चौकशी केली. काही दिवसांपूर्वी डीआरआयने अतुलच्या भावाच्या कारखान्यात छापा टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते.

धारावीतून 2 कोटींचे हेरॉईन जप्त
अमली पदार्थ विरोधी कक्ष (एएनसी) घाटकोपर युनिटने धारावी परिसरात कारवाई करून दोन कोटी 40 लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी मनझार दीन मोह्हमद शेखला अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धारावी परिसरात एक जण हेरॉईनची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शशांक शेळके, खैरे, पाटील यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी धारावी परिसरात सापळा रचत ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या