Holi धुळवडीला गालबोट बदलापूर, कर्जत, वसईत नऊ बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,ठाणे

धुळवडीच्या सणाला गालबोट लागले.  वसईत एकाच कुटुंबातील पाच जणांचा अर्नाळा येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. बदलापुरातील बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले तर कर्जतच्या पाषाणे येथील उल्हासनदीत बुडून दोन नातेवाईकांचा दुर्दैवी अंत झाला.

धुळवडीची मजा लुटल्यानंतर वसईच्या अंबाडी रोड येथे राहणारे  मौर्या व गुप्ता कुटुंब अर्नाळा येथील समुद्रावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने निशा मौर्या, (40), प्रशांत मौर्या (17), प्रिया मौर्या (19), कंचन गुप्ता (38), शीतल गुप्ता (32) यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. त्यासाठी तटरक्षक दलाची मदतही घेण्यात येत आहे. रात्री उशिरा प्रशांत मौर्या याचा मृतदेह सापडला तर उर्वरित चार जणांचा शोध सुरू होता. रायगड जिह्यातील कर्जतजवळील पाषाणे येथील उल्हास नदीवर  विनय सिंग हे त्यांचे घाटकोपर येथून आलेले बहिणीचे पती देवेंद्र सिंग यांच्यासह पोहण्यास गेले. खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अद्याप सापडले नसून उशिरापर्यंत शोध सुरू होता. बदलापूर येथील बॅरेज बंधाऱ्यात कल्पेश चौधरी आणि कार्तिक लाडी हे दोघे पोहायला उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पेश बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी कार्तिकने सूर मारला परंतु दोघांचाही बुडून मृत्यू झाला.