
गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे सत्र पाहायला मिळत आहे. अपघातांची कारणे वेगवेगळी असली तरी अशा घटनांमुळे परिस्थिती मृतकांची आणि जखमींची संख्या वाढली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एका खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या भीषण धडकेनंतर बसला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत ९ जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला आहे. बंगळुरूहून शिवमोग्गाकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग-४८ वर (NH-48) पहाटे २:३० च्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येणारा एक ट्रक डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला आला आणि त्याने समोरून येणाऱ्या खाजगी स्लीपर बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रक बसच्या इंधन टाकीवर (डिझेल टँक) आदळला. यामुळे डिझेलची गळती होऊन बसने क्षणात पेट घेतला.
‘सीबर्ड कोच’ या कंपनीची ही बस ३२ प्रवाशांना घेऊन जात होती. आग लागताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. पोलीस महानिरीक्षक रविकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ट्रकने डिव्हायडर ओलांडून धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात बसमधील ८ प्रवासी आणि ट्रक ड्रायव्हर अशा एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. काही प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उडी घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर करण्यात आली आहे.
अपघातातून बचावलेल्या आदित्य नावाच्या प्रवाशाने सांगितले की, ‘धडक झाल्यानंतर सगळीकडे आग पसरली होती. बसचा दरवाजा उघडत नव्हता, शेवटी काच फोडून आम्ही बाहेर पडलो. इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग इतक्या वेगाने पसरली की कोणालाही मदत करणे कठीण झाले होते.’
या अपघातामुळे महामार्गावर सुमारे ८ ते १० किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.





























































