
शिक्षक नेत्याच्या वाढदिवसासाठी जाणे वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ नऊ शिक्षिकांना चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यावर असताना विनापरवानगी शाळेला दांडी मारून वाढदिवसाला जाणाऱ्या त्या शिक्कांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.
तालुक्यातील परसोडा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रभारी केंद्रप्रमुखांचा 23 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे तालुक्यातील धोंदलगाव व परिसरातील तब्बल नऊ शिक्षिकांनी कर्तव्यावर असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विनापरवानगी परसोडा गाठले होते. याबाबत या गणाच्या पंचायत समिती सदस्या सुषमा वाघ यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयास तक्रार दिल्याने ही बाब उघडकीस आली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत या विषयावरून चांगलाच गदारोळ झाला होता. यासंदर्भात उपसभापती प्रभाकर बारसे, सदस्या सुषमा वाघ यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दांडीबहाद्दर शिक्षिकांची चौकशी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांची नियुक्ती करण्यात येऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीदरम्यान संबंधित शिक्षिका या शालेय वेळेत शिक्षक नेत्याच्या वाढदिवसासाठी गेल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे संबंधित शिक्षिकांविरुद्ध कारवाई करणे योग्य असल्याचा अहवाल कांबळे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिवेकर यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी शिक्षिकांनी केलेला खुलासा शिक्षण विभागाने अमान्य केला आहे. परंतु प्रक्रियेचा भाग म्हणून प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांनी त्या नऊ शिक्षिकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. दरम्यान, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांचा चौकशी अहवाल, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मासिक सर्वसाधारण सभेत याबाबत उठविलेले रान आदी बाबी लक्षात घेऊन मनीष दिवेकर यांनी त्या शिक्षिकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. एस. एस. पोंदे, एल. एस. गायकवाड, एम. टी. बिचेवार (धोंदलगाव), बी.बी. घुणावत (पानसरेवस्ती), एस. के. मेटे, एस. बी. देशपांडे (आदिवासी वस्ती शाळा), व्ही. एस. आकोलकर (साखरे वस्ती शाळा), एस. आर. गिरवले (अंबिकानगर शाळा), एस. बी. भंडारे (जमनवाडी) या सर्व शिक्षिकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.


























































