
हिंदुस्थानच्या 19 वर्षीय डी. गुकेशनंतर आता अवघ्या 9 वर्षांच्या आरित कपिलने अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. दिल्लीच्या आरितने नॉर्वेच्या कार्लसनला ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतील ‘अर्ली टाइटल्ड टय़ूसडे’ या स्पर्धेत बरोबरीत रोखले.
आरित कपिलने पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनच्या प्रत्येक चालीला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. या लढतीत कार्लसन पराभवाच्या छायेत होता. मात्र, अखेरच्या क्षणी काही सेकंदांचा खेळ राहिल्यामुळे आरितला या वर्चस्वाचे विजयात रूपांतर करता आले नाही. हिंदुस्थानच्या 16 वर्षीय आर. प्रज्ञानंदानेदेखील कार्लसनला हरविलेले आहे.
कार्लसन हा बुद्धिबळ जगतातील ‘नंबर वन’ खेळाडू आहे. त्याने 2013 पासून 2023 पर्यंत वर्चस्व गाजविलेले आहे. कार्लसनने क्लासिकल, रॅपिड व ब्लिट्ज या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक किताब जिंकलेले आहेत. त्यामुळे नॉर्वेच्या या महान खेळाडूला हरविणे किंवा त्याच्याविरुद्ध डाव बरोबरीत सोडवणे हीदेखील मोठी कामगिरी ठरत असते. हिंदुस्थानच्या 9 वर्षीय आरित कपिलने कार्लसनला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला.
हिंदुस्थानचा व्ही. प्रणव विजेता
या स्पर्धेत हिंदुस्थानच्या व्ही. प्रणवने जबरदस्त कामगिरी करीत 11 पैकी 10 गुणांची कमाई करीत विजेतेपद पटकावले. अमेरिकन ग्रॅण्डमास्टर मोके नीमन व मॅग्नस कार्लसन यांना प्रत्येकी 9.5 गुणांची कमाई केली. मात्र, टायब्रेकच्या आधारे नीमनने उपविजेतेपद पटकावले, तर कार्लसनला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.