
रायगड जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या शिक्षणाचा गाडा अडला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल ९७१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. शिक्षकांपासून ते विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत विविध महत्त्वाच्या पदांचा त्यात समावेश आहे. भरती न झाल्याने शिक्षकच नाहीत तर शिकवणार कोण? अशी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासाठी एकूण ६ हजार ७२९ पदे मंजूर आहेत. त्यातील ५ हजार ७५८ पदे भरलेली आहेत. मात्र ९७१ पदे अजूनही रिक्त आहेत. त्यात प्राथमिक शिक्षकांची ६८८ पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. या रिक्त पदांमध्ये ११४ केंद्रप्रमुख (सरळ सेवा), ३१ केंद्रप्रमुख (पदोन्नत्ती), ९२ मुख्याध्यापक (पदोन्नत्ती) तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. या रिक्त पदांमुळे उपलब्ध शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कामाचा जादा ताण पडत आहे.
पाठपुरावा सुरू आहे
या रिक्त पदांच्या भरतीसाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी दिली. शिक्षकांची पदे सरळ सेवेतून तर केंद्रप्रमुखांची पदे सरळ सेवा व पदोन्नत्तीने भरली जाणार आहेत. पदोन्नत्तीसाठी विभागीय परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर मुख्याध्यापकांच्या पदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचेही दहितुले यांनी सांगितले.






























































