99 वर्षांचे कलकोटे देशातील सर्व निवडणुकीत मतदान करणारे ज्येष्ठ नागरिक

33

सामना प्रतिनिधी । वाढवणा

वाढवणा बु. येथील रहिवाशी असलेले दिगंबर धोंडिबा कलकोटे यांचा जन्म 1920 साली झाला असून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेंव्हा निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली तेंव्हापासून दिगंबर कलकोटे यांनी गाव पातळीवरील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. 18 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठीही ते उत्सुक आहेत.

दिगंबर कलकोटे म्हणाले की, अगोदरची निवडणूक गरिबांसाठी देशहितासाठी होती. एकमेकात आदरभाव होता. प्रचार करत उमेदवार घरापर्यंत येऊन आशीर्वाद घेत होते. आता मात्र सोशल मीडिया, टिव्हीवर सगळं कांही दिसत आहे, कळत आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. मी 1992 ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मी गावामध्ये दैनिकांची एजन्सीही चालवली आहे. मला एक मुलगा होता, तीन मुली आहेत. मुलाचे त्याच्या वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या दोन वर्षानंतर सूनबाईचे निधन झाले. तरुण नातू 45 व्या वर्षी मरण पावला. आता घरात बसूनच पेपर वाचतो. गुरुवारी होणाऱ्या लोकसभेसाठी मतदान करणार आहे. मी असा एकमेव नागरिक आहे की दिल्ली ते गल्ली पर्यंतच्या सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. दरवेळेस स्वतः जाऊन मतदान करत होतो मात्र आता नातवा सोबत जाऊन मतदान करावे लागणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या