‘जीवनवाहिनी’चा प्रवास जीवघेणा, लोकल मार्गावर पाच महिन्यांत तब्बल 922 प्रवाशांचा मृत्यू; माहिती अधिकारातून आकडेवारी उघड

उपनगरी रेल्वे मार्गावरील अपघातांचे सत्र रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. लोकल ट्रेनमधून पडणे वा रूळ ओलांडणे अशा विविध अपघातांमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल 922 प्रवाशांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. ‘जीवनवाहिनी’चा प्रवास अद्यापही जीवघेणा असल्याचे यातून उघड झाले आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून पाच प्रवाशांना जीव गमवावा लागला. त्या घटनेने लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन लोकल प्रवास सुरक्षित असल्याचा दावा करीत आहे. मात्र माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी मागील पाच महिन्यांतील अपघाती बळींची आकडेवारी मागवली होती. त्यांच्या अर्जावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरानुसार, 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत 922 प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले. त्यात 210 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांचा रूळ ओलांडणे वा अन्य प्रकारच्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्याचे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळवले आहे.

z उपनगरी रेल्वेच्या पश्चिम, मध्य व हार्बर मार्गांवरील लोकल ट्रेनमधून दररोज 70 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. यापैकी मध्य रेल्वे मार्गावर 597 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 325 प्रवाशांचा मागील पाच महिन्यांत मृत्यू झाला. यात लोकलमधून पडून मरण पावलेल्या प्रवाशांची संख्या मध्य रेल्वेवर 150 तर पश्चिम रेल्वेवर 60 नोंद झाली आहे. टाळता येण्याजोग्या कारणांमुळे प्रवाशांचे हकनाक बळी जात आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी दिली आहे.