शिवणीत युवकाचा संशयास्पद मृत्यू, खुनाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

तालुक्यातील शिवणी कोतल येथील सद्दाम सरदार शेख (२५) या तरुणाचा गावाशेजारी ऊसामध्ये मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे

सद्दाम शेख शिवणी येथील धनाजी शेळके यांच्या शेतात ट्रॅक्टरवर मजुर म्हणून काम करत होता. कामाच्या ओघात तो आठ आठ दिवस घरी जात नव्हता. सोमवारी शिवणी कोतल ते भोसलेवाडी रस्त्यालगतच्या ऊसात एक इसम गवत आणण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी सद्दाम मृत अवस्थेत आढळून आला. ही बातमी गावात पसरताच नातेवाईकासह गावकऱ्यांनी त्या ठिकाणाकडे धाव घेतली. यावेळी सद्दामच्या डोक्यावर पाठीवर जखमेच्या खुणा आढल्याने तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर आपल्या टीम सह दाखल झाला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पानचिंचोली आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खून करणाऱ्या संशयीत आरोपींना अटक करा तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असे म्हणत नातेवाईकांनी उपकेंद्रासमोर ठिय्या मांडला आहे.