
सामना प्रतिनिधी । मुंबई
मान्सून सोमवारी केरळात दाखल झाल्याची घोषणा ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने केली होती, पण हवामान खात्याने मान्सून केरळात आल्याची ऑफिशियल घोषणा केली आहे. या खात्याने मान्सून महाराष्ट्रात ५ जूनलाच दाखल होईल, अशी ब्रेकिंग न्यूजही दिली आहे. अर्थात त्याचा प्रवास विनाअडथळा झाला तरच तो या तारखेला महाराष्ट्राला भिजवणार आहे.
यंदा तीन दिवस आधीच मान्सूनचे केरळात आगमन झाले आहे. नैऋत्य मोसमी पावसाने नैऋत्य अरबी समुद्र, कामोरिन (मालदीवचा भाग) लक्षद्वीप, केरळातील बराचसा भाग आणि तामीळनाडू व बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापला, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
केरळनंतर कर्नाटक, गोवा पार करीत सिंधुदुर्गमार्गे मान्सून मुंबई आणि नंतर महाराष्ट्रात दाखल होतो. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सात दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो.
























































