
सामना ऑनलाईन । बालासोर
पाच हजार किलोमीटर पर्यंत अचूक मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी ५’ या क्षेपणास्त्राची आज लष्काराने ओडीशातील अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी केली. सकाळी ९.४८ च्या सुमारास, ही चाचणी घेण्यात आली. ही या क्षेपणास्त्राची सहावी यशस्वी चाचणी असून लवकरच हे क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात सामिल केले जाणार आहे.
जमिनीवरून जमिनीवर पाच हजार किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र संपूर्णत: हिंदुस्थानी बनावटीचे आहे. १७ मीटर लांब आणि पन्नास टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २०१२ साली घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्रातून तब्बल दीड हजार किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेले जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी अडीच हजार कोटींचा खर्च आला आहे.
हे क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात सामिल केल्यानंतर पाच हजार किलोमीटरची भेदक क्षमता असलेल्या देशांच्या यादित हिंदुस्थानचा समावेश होणार आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांकडेच अग्नी-५ च्या ताकदीची क्षेपणास्त्र आहेत.

























































