
सामना प्रतिनिधी । ठाणे
आदरणीय पवारसाहेबांनी काय काय लाड पुरवलेत तुमचे…१९४७ साली तत्कालीन दिग्गजांना डावलून ठाण्याच्या महापौरपदी तुमच्या वडिलांना बसवलं तेव्हा कधी गटबाजी वाटली नाही…१९९२ ते आतापर्यंत विधान परिषदेवर उमेदवारी, इतकेच नव्हे तर उपसभापतीपद दिले. निरंजन डावखरे राष्ट्रवादीने तुम्हाला आमदार केले. भाजप म्हणजे युज ऍण्ड थ्रो करणारा पक्ष. मग सांगा निरंजन, भाजपच्या कळपात का गेलात. अवघ्या तीन मिनिटे २३ सेकंदांची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर जबरदस्त धूम गाजवत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ही क्लिप व्हायरल केली असून त्यामुळे येत्या काही दिवसांत सोशल मीडियावर उमेदवारांचे वाद रंगताना दिसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची होणारी पीछेहाट आणि भाजपवाल्यांचे ‘अच्छे दिन’ हेरून निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कमळछायेत आसरा घेतला आहे. त्यामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादीने काय कमी केले होते अशा आशयाची ही क्लिप आहे यात डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना ठाण्यातील स्थानिक नेतृत्वावर जे आरोप केले आहे ते कसे चुकीचे आहेत हे दाखविण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये मागील तीस वर्षांत डावखरे कुटुंबांना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कशाप्रकारे राजकारणात विविध पदे दिली आहेत याचे दाखले देण्यात आले आहेत.
सोशल वॉर रंगणार
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा तिरंगी होणार असल्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतर्फे संजय मोरे, भाजपने निरंजन डावखरे तर राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली असून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आहे. पदवीधर मतदारांकडून होणाऱया सोशल मीडियाच्या वापरामुळे प्रचाराची रंगतही येथेच रंगताना दिसणार आहे. जसजशी ही निवडणूक जवळ येणार तसतसे सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधातील प्रचारनाटय़ अधिकाधिक रंगणार आहे.





























































