
>> माधव डोळे
दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाने दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सुमारे चार हजार दुर्मिळ पुस्तके किऑस्क या आधुनिक तंत्रज्ञानावर आता कुणालाही वाचायला मिळतील. १४ लाख पाने किऑस्कवर वाचता येणार असून ग्रंथालयाच्या चार शाखांमध्ये चार किऑस्क मशीन उपलब्ध होणार आहेत. दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाच यानिमित्ताने तरुण पिढीसाठी मिळत असून हा अनमोल ठेवा जपण्याचे काम ग्रंथसंग्रहालयाने केले आहे. वाचन संस्कृती आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तरुणांमध्ये रुजविण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांविषयी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर वालावलकर यांच्याशी केलेली बातचीत.
पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचा प्रकल्प नेमका काय आहे?
– ग्रंथ अमर झाले पाहिजेत. कागदांची आयुर्मर्यादा ठरलेली आहे. आमच्याकडची अत्यंत दुर्मिळ पुस्तकं उघडणंही अवघड आहे. कारण पान हातात घेतलं की त्याचे तुकडे पडतात. मग त्याच्यातील जे ज्ञान आहे त्याचं आधुनिक तंत्राचा वापर करून जतन करायला पाहिजे. मायक्रोफिल्मिंग, झेरॉक्सिंग व त्याचं लॅमिनेशन करता येतं, पण या सगळ्या प्रकारांच्या आपापल्या मर्यादा आहेत. प्लॅस्टिकचेही अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत. त्याची पुढची पद्धत डिजिटलायझेशन इमेजच्या स्वरूपात ते पुस्तक सामावलं जातं आणि इमेजच्याच स्वरूपात तुम्हाला वाचता येतं. आता तर इमेजमध्ये कॅरेक्टर्सही रेकग्नाईज करता येतात. इथपर्यंत आपली टेक्नॉलॉजी पुढे गेलीय.
तुम्ही किती पुस्तकांचे डिजिटलायझेशन केले … खर्च किती आला?
– आम्हाला डिजिटलायझेशनचा खर्च ५० लाख रुपये एवढा आला. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत हे पैसे ग्रंथसंग्रहालयाला उपलब्ध करून दिले. आम्ही आतापर्यंत चार हजार दुर्मिळ पुस्तके डिजिटलाईज केली व ती किऑस्कवर टाकली आहेत. ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचायला हवीत. इमेजच्या फॉर्ममधील ही दुर्मिळ पुस्तकं आता निरंतर राहतील. ती जर आम्ही क्लाऊडवर टाकली आणि पासवर्ड दिला तर जगभरातला कोणताही मराठी माणूस ही पुस्तकं वाचू शकतो. या दुर्मिळ पुस्तकांना रेफरन्स व्हॅल्यू आहे. भविष्यात चार हजार पुस्तकं आम्ही नेटवर टाकणार आहोत. किऑस्कवरदेखील ही पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत, मात्र त्याची कॉपी कुणाला करता येणार नाही. फार तर फोटो काढता येईल.
किऑस्क हा प्रकार नेमका काय आहे?
– टोटली इन्फर्मेशन देणारं सेंटर म्हणजे किऑस्क. त्यावर किंडलसारखा ग्लोअर नसलेला पडदा असतो. आतापर्यंत ई बुक होती. माऊस घेऊन ते शोधत बसायला लागायचं. त्याच्याही पुढे जाऊन एक स्टेप म्हणजे टच स्क्रीन किऑस्क. तुम्ही स्क्रीनवर दोनदा टच केलं की ती स्क्रीन लगेच मोठी होते. त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला वाचता येतं. ई बुकचं तंत्रज्ञान जे पुढे चाललंय त्यात फक्त वाचन नाहीये. त्यातील शब्दांचा अर्थ जर तुम्हाला हवा असेल तर डबल क्लिक करा. थिसॉरस उघडतो. त्या थिसॉरसमध्ये तुम्हाला शब्दांचा अर्थ दिसतो. ‘ई बुक’मध्ये ही सोय असली तर ती तुम्हाला ‘किऑस्क’मध्येही मिळेल.
वाचकांनी तो ऑपरेट कसा करायचा?
– किऑस्कच्या स्क्रीनवर पुस्तकांचा मेनू दिसेल. पुस्तकाचं कव्हर दिसेल. वर वर करत जा म्हणजे स्क्रोल करा आणि हव्या असलेल्या कव्हरवर तुम्ही बोट लावलं की ते पुस्तकं उघडतं. त्या पानाला टच केलं की ते पान आपोआप उलगडलं जातं आणि पुढचं पान येतं थोडक्यात काय तर अगदी खऱयाखुऱया पुस्तकाप्रमाणे तुम्हाला ‘किऑस्क’वर पानं उलगडता येतील.
या आधुनिक तंत्रज्ञानासाठी वाचकांना पैसे द्यावे लागतील का?
– बिलकुल नाही. किऑस्कचं तंत्रज्ञान हे मोफत आहे. वाचकांना फुकट ते वाचायला मिळेल. अशी आमच्याकडे चार मशीन येणार आहेत. त्यातील एक आलंय, खर्च नाही. ‘अॅडराईज’ या कंपनीने ही मशीन आम्हाला मोफत दिली. ठाणे शहरात असे ५० किऑस्क बसवण्याचं ऍडराईज या कंपनीने ठरवलंय. ठाणेकर वाचकांना त्यावरील पुस्तकं फुकट वाचता येतील.
कोणत्या प्रकारची दुर्मिळ पुस्तकं वाचायला मिळतील?
– आमच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकाचं लाईफ संपत आलंय. काही १५० वर्षांपूर्वीची तर काही १२५ वर्षांपूर्वीची पुस्तकं आहेत. दुर्मिळ मासिकंही आहेत. संख्याशास्त्र्ा, ज्योतिषशास्त्र, विज्ञान, जुनी नाटकं, जुन्या एकांकिका, कथासंग्रह, चरित्र, वैद्यकशास्त्र्ा अशी वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ पुस्तकं ‘किऑस्क’वर टाकली आहेत. वाचनालयास १५० वर्षे झाली, पण त्याही पूर्वी प्रसिद्ध झालेली दुर्मिळ पुस्तकं आमच्या संग्रहालयात आहेत. ही सारी जुनी पुस्तकं नव्या स्वरूपात वाचायला मिळतील.
प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो…
– हो, बरोबर आहे, पण किऑस्कवर तो आनंद कसा मिळेल? तुमची आमची पिढी पुस्तकांचा वास घेऊन जगली आहे. या पिढीला जुने सगळे वास माहिती आहेत. नवीन पिढीला सेंटचे वास माहिती आहेत. पुस्तकांचे वास त्यांनी कुठे घेतलेत? बायंडिंग केलेली वह्या, पुस्तके ही पिढी वापरत नाही. दरवर्षी नवीन पुस्तकं आणतात. पानांचा स्पर्शसुद्धा आपल्याला माहिती होता. त्या पुस्तकाशी एक नातं जोडलं जायचं, मात्र पूर्वीचे विश्व आणि आजचे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अजूनसुद्धा तुम्हाला मेल आला तर त्याचं प्रिंटआऊट काढून ती वाचावीशी वाटते. आता पुढच्या पिढीचा विचार करायला हवा.




























































